लडकोंसे गलती हो जाती है! म्हणत परवाच सपाच्या मुलायमसिह यादवांनी आपल्या निर्दयी काळजाचं दर्शन घडवलं. शक्ती मिल बलात्कार प्रकरणात तीन युवकांना झालेली फाशीची शिक्षा त्यांना भलतीच झोंबली असावी. एखाद्या प्रकरणात इतक्या झटपट निकाल लागला. आणि त्यातही इतक्या कठोर शिक्षा होऊ लागल्या तर यांच्या बगलबच्च्यांचं काय होणार? या चिंतेने त्यांना ग्रासलंय. म्हणूनच सत्तेवर आल्यास बलात्कार करणाऱ्यांना फाशी देणारा कायदाच रद्द करण्याची घोषणाही त्यांनी केली.मुलांकडून तारूण्याच्या भरात होतात चुका, मान्य! पण त्याच्या चुकांची शिक्षा मुलींनी का आयुष्यभर भोगायची? आणि तेही तीच चुका (गुन्हा नव्हे?) करणारी मुलं उजळ माथ्याने आजुबाजूला फिरत असताना? या विचार मुलायमसिंहांच्या मनात आला नाही का? का एवढा विचार करण्याची त्यांची कुवतच नाही? निवडणुकीच्या रणधुमाळीत लक्ष वेधून घेण्याची या असल्या राजकरण्यांना कायम गरज भासते. पण त्यासाठी इतक्या हीन पातळीवर जाण्याची काय गरज?
आणि त्यातही योगायोग म्हणा किंवा हेतुपुरस्सर, मुलायमसिंहांनी संदर्भ दिलाय तो शक्ती मिल बलात्कार प्रकरणाचा. खरंतरं बलात्काऱ्यांना फाशीच व्हावी, ही मागणी जोर धरू लागली ती निर्भया प्रकरणानंतर. त्यावेळच्या जनरेट्यामुळे सरकारला अशा गुन्ह्यांसाठी कठोर कारवाईची तरतूद करावी लागली. या प्रकरणातही चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. पण तेव्हा मुलायमसिंह काहीच बोलले नाही. तेव्हा त्यांना त्या चार जणांचा कैवार घ्यावा असे वाटले नाही. पण शक्ती मिल प्रकरणात तिघांना फाशी सुनावल्यावर मात्र त्यांना गहिवर दाटून आला. शक्ती मिल प्रकरणातील आरोपींची नावं आणि निवडणुकीची हवा याची सांगड घातली तर या करूणेमागचं कारण सहज स्पष्ट होईल.
अर्थात कालपर्यंत ही केवळ शंकाच होती. पण मुलायमसिंह यादवांचे महाराष्ट्रातील चेले अबू आझमी यांनी काल जे अकलेचे तारे तोडले त्यावरून हा संशय अधिकच बळावला. विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेबरोबरच बलात्कार झालेल्या महिलेलाही फाशीची शिक्षा द्यायला हवी, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली. वाह रे वा! म्हणजे मुलं चुकतात म्हणून त्यांना सोडून द्यायचं. आणि त्यांच्या चुकांची तक्रार केली म्हणून मुलींना फासावर चढवायचं. हा यांचा न्याय! आणि त्याला आधार म्हणून इस्लामचा कायदा! इस्लाम मध्ये सांगितलंय म्हणे ! काय बदनामी चालवली आहे स्वत:च्याच धर्माची!
आज ज्यांच्यावर बलात्कार होत आहेत, त्या मुली सात महिन्यांपासून सत्तर वर्षांच्या आहेत. त्यातल्या निर्भया आणि गुडिया सारख्या कित्येक निष्पाप मुली सामुहिक बलात्काराचा भार सहन न झाल्याने जीव गमावून बसल्या आहेत. त्यांना तुम्ही फाशी देणार?
कुठेही बलात्कारांच्या घटनांविरोधात आवाज उठायला लागला की, मुलींचे कपडेच आक्षेपार्ह होते. मुली कशाला रात्री-अपरात्री हिंडतात. मुलीच बलात्काऱ्यांना उद्युक्त करतात. असली काहीतरी बेपर्वा विधानं करून चर्चेचा ओघ आपल्याकडे वळवायचा आणि मुळ मुद्याला फाटा फोडायचा असलं करंटे उद्योग आपल्याकडे नेहमीच चालतात. पण सात – आठ महिन्यांच्या बालिकांनी असं काय आक्षेपार्ह केलं होतं, याचं उत्तर देणं मात्र सोयीस्कर टाळतात. निर्भया प्रकरणात तर एका स्वयंघोषित संतानं कळसच केला होता. तीनं त्या मुलांना भैया म्हणून विनवणी करायला हवी होती. त्यांनी तिला सोडून दिलं असतं. तिने त्यांना प्रतिकार करायचा प्रयत्न केला ही तिचीच चुक, असं जाहीर करून टाकलं. (अर्थात हाच थोर संत नंतर स्वत:च बलात्काराच्या आरोपावरून तुरूंगात गेला हा भाग वेगळा.) तर अजून एका थोर बापूंनी बलात्काऱ्यांपासून रक्षणासाठी स्वत:च्या नावाची चालिसाच जपायला सांगितली.
बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याविषयी इतकी टोकाची असंवेदनशील व्यक्तव्ये करूनही यापैकी कुणाचंच समाज काहीच बिघडवू शकला नाही, हे विशेष. चार दिवस बातम्या आल्या आणि गेल्या. महिलांची सुरक्षा तशीच टांगणीली लागलेली. अब्रुचे धिंडवडे रोजचेच. एकूणच महिला कितीही शिकल्या-सवरल्या तरी त्यांना स्वत:चा ठाम आवाज नाही, हे सगळ्यांनीच जाणलं. आणि म्हणूनच निवडणुकीत मतांची बेगमी करण्यासाठी. एका गटाला खुश करण्यासाठी देशातल्या ५० टक्के मतदार असलेल्या महिलांच्या जखमेवरील खपली काढली गेली.
आरोपींचा कड घेताना, आपण पिडीतांचा अपमान करतो आहोत याची चाड बागळण्याची गरज उरली नाही. आरोपीला केवळ आरोपी म्हणूनच बघायला हवं. त्याचा जात, प्रांत, धर्म बघू नये. पण दुर्दैवाने आपल्याकडे तसे होत नाही. निवडणुकाजवळ आल्या की विशिष्ट गटाला खुश करण्यासाठी वाट्टेल त्या तडजोडी केल्या जातात. आणि त्याचं कुणालाचं काही वाटत नाही.
साड्या वाटल्या नि हळदीकुंकुचा घाट घातला की बायका खुश, यापलीकडे काही विचार करायची गरज उरली नाही. महिलांच्या नावावर अनेक योजना आल्या आणि गेल्या. अनेकांनी संघटना काढल्या - चालवल्या. आंदोलने किली आणि संपवली. पण अजुनही महिलांना समान हक्क तर सोडाच, सन्मानानं जगण्याचा हक्कही मिळाला नाही. तिची विटंबना कायमच राहिली.