Pages

Saturday, 22 March 2014

शिवसेनेच्या घराचे फिरले वासे

सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी बिगुल वाजले, सैन्य तैनात झाले आणि रणांगणावर शूरवीर, योद्धे यांची जमवाजमव सुरू झाली तेव्हा अनेकांना कळले की आपल्या पायाखालची वाळू निसटते आहे. ती वाळू आहे की माती? पाय सटकताहेत की ओढले जाताहेत? बरं, ते नेमके कोण ओढताहेत? परकीय की स्वकीय? शत्रूपक्षातील कार्यकर्ते आहेत का हे पाय ओढणारे की आपल्याच गोटातले आपलेच पाय आजवर चाटणारे आपलेच लोक आहेत? या संभ्रमात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते विरोधकांवर कशा प्रकारे कुरघोडी काढता येईल, याचा विचार करत आहेत.

महाराष्ट्र प्रांतात तुर्तास तरी रणांगणावर उधाण आले आहे महाराजा, आणि यात कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार. कोणी बघता बघता गल्लीतून दिल्लीत जाणार तर कोणी दिल्लीचे स्वप्न पाहता पाहता तुरुंगात खितपत पडणार. काळ सर्वात मोठा विश्‍लेषक असतो. त्याच्याकडे सर्व रोगांवर, आजारांवर उपाय आहे. तो वेळच्या वेळी सारं घडवतो, तोच पसारा मांडतो आणि तोच सारं मोडून तोडून मोकळा होतो. त्याच्या तडाख्यात सापडलेले मग राजकीय आणि सामाजिक पटलावरूनही नाहिसे होतात. महाराष्ट्रात सध्या अशी प्रकरणे वाढीस लागली आहेत. निमित्त आहे ते निवडणुकांचे. पण सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या सट्टाबाजारात दिल्लीत कोणाचे सरकार आणि महाराष्ट्रातून कोणाचे किती उमेदवार, यावर हा खेळ भरकटतो आहे.

या वावटळीत 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण अशा वल्गना करणार्‍या शिवसेनेचे पानिपत होत आहे. शिवसेना सोडून खासदार, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते दूर जात आहेत. आजवर ते आपल्याकडे होते तेव्हा त्यांचे गुण-अवगुण दिसले नाहीत. पण ते सोडून जाताच ते गद्दार होते, असा साक्षात्कार शिवसेनेतील धेंडांना लागला आहे. मुळात शिवसेना आता बाळासाहेबांच्या निधनानंतर ‘पोरकी’ व सर्वसामान्य शिवसैनिकांना ‘परकी’च झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नेभळट आणि बालिश असल्याची टीका हा पक्ष सोडून परपक्षात प्रवेश घेणार्‍या माजी शिवसैनिकांनी केली आहेच. यंदाची लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी महायुती सज्ज असल्याचा दावा केला जातो आहे, ती महायुती आतून किती पोखरली आहे, ते न दिसण्याएवढे मतदार दुधखुळे नाहीत. महागाई, भ्रष्टाचार, सुरक्षितता वगैरे तेच तेच पठडीतले मुद्दे घेऊन केंद्रात बदल घडवण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती प्रयत्न करणार, असे चित्र उभे केले जात आहे.

पण मध्यंतरी शिर्डीतून खासदार भाऊसाहेब वाघचौरे शिवसेना सोडून गेले, शिर्डीतून उमेदवारी मिळालेले बबनराव घोलप यांना तर 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. साईबाबांची शिर्डी शिवसेनेला यंदा तरी धार्जिणी नाही. पण मुख्य मुद्दा असा आहे की, भष्टाचारी बबनराव घोलप यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगवास होतो, तोही त्यांनी 1999 मध्ये महाराष्ट्रातील युती सरकारच्या काळात केलेला असतो, त्यावेळी ते समाजकल्याण मंत्री असतात, गेली 14 वर्षे त्या भ्रष्टाचार प्रकरणाचा ससेमिरा त्यांच्या मागे असतो, अशा वेळी, अशा काळात शिवसेनेचे दिग्गज नेते, जे भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवण्याच्या पोकळ गर्जना शिवतीर्थावर आणि दादरच्या शिवसेना भवनातून देतात, त्यांना यंदा जनतेसमोर तोच मुद्दा घेऊन येण्यास कुठले तोंड उरले आहे? अण्णा हजारे यांनी वारंवार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा यांच्या नेत्यांची पाळेमुळे खोदून त्यांच्या भ्रष्टाचारी प्रकरणाची अगदी पुराव्यांसकट तक्रार केली होती. त्यात त्यांची कितीतरी वर्षे खर्ची पडली. त्यापैकी काही नेत्यांवर कारवाई झाली, काही जण मोकळे सुटले, काहीजणांना पक्षाने पदराआड घेऊन बचाव केला. काही ठिकाणी अण्णाच उघड पडले तर काही ठिकाणी भ्रष्टाचारी नेत्यांपेक्षा पक्षाची नाचक्की झाली. असे हे खेळ बरेच रंगले या काळात.

पण जेव्हा बबनराव घोलपांचा घोळ समोर आला तेव्हा मात्र शिवसेना नेते संभावितासारखे वागू लागले. त्यांनी आपल्या मतदारांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात शिवसेना आपले उमेदवार उभे करून लोकसभेसाठी इतर राज्यातही आपण सज्ज असल्याचा देखावा उभा करण्यात मशगुल झाले होते. मघाशी म्हटले त्याप्रमाणे शिवसेनेच्या पायाखालची वाळू निसटत चालली आहे. अशावेळी जुनी जाणती अनुभवी माणसं त्यांना नकोशी झाली आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. भाऊसाहेब वाघचौरे, उदय दुधगावकर, आनंद परांजपे, गजानन बाबर, राहुल नार्वेकर, मोहन रावले, अभिजीत पानसे, रवींद्र माने, त्याआधी भास्कर जाधव, राज ठाकरे, नारायण राणे, सतीश प्रधान, गणेश नाईक, छगन भुजबळ असा इतिहास आहे, या मंडळींनी शिवसेना सोडली व इतर पक्षांची कास धरली. प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे यांच्यासह मिलिंद नार्वेकर यांचेही नाव पुढे यायचे. याच मिलिंद नार्वेकरमुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली, असे सगळेजण खासगीत आणि जाहीरपणे सांगतात. त्या मिलिंदचे नक्की काय साटेलोटे आहे, ते एकदा बाहेर आले पाहिजे. शिवसेनेच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना, सर्वसामान्य नागरिकांना हा मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्यात आडकाठी का घालतो, त्याचा काय स्वार्थ आहे ही विवंचना कायम आहे. एकदा तरी मिलिंद नार्वेकर नावाच्या त्या झारीतील शुक्राचार्याने आपली भूमिका स्पष्ट करावी. उद्धव ठाकरे यांना हे तमाशे शिवसेनेत चालतातच कसे? ते मिलिंदला याचा जाब का विचारत नाहीत, त्याच्यावर कारवाई का करत नाहीत? पण केव्हातरी याही नार्वेकराला शिवसेनेतून जावे लागेल, असे जुनेजाणते व अन्यायग्रस्त शिवसैनिक खासगीत पण तीव्र संतापाने सांगत असतात.

आता तर बबनराव घोलपांना पक्षातून कायमस्वरूपी काढावेच लागेल. कारण, त्यांची आमदारकी तर जाणारच आणि लोकसभेची उमेदवारीही. हे असे फटके आणि धक्के शिवसेनेला केवळ लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीपूर्वीच बसले आहेत, असे नाही. त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आणि अगदी पोटनिवडणुकीपूर्वीही बसले आहेत. त्यातूनही पक्ष प्रमुख काहीच बोध घेत नाहीत. ते आपल्याच नादात, आपल्याच विश्‍वात, आपल्याच कुटुंबात, आपल्याच छंदात मग्न असतात, असे दिसल्यावर कार्यकर्ते चिडणार नाहीत तर काय! मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची त्यांचे सध्याचे पक्षश्रेष्ठी कसा हिरमोड करतात ते सगळेजण रोजच्या रोज अनुभवत आहेत. तरीही अडवाणी अधूनमधून हट्टीपणा करून आपले हित साधतात, पण मनोहर जोशी तर पार तळाला फेकले गेले आहेत. वयाची 80 आली तरी त्यांना राजकारणाचा मोह सुटलेला नाही. काहीही करा, पण मला संसदेत पुढच्या किंवा मागच्या दाराने पाठवा, अशी आर्जव करणार्‍या पंतांचा तर सेनेत वेळोवेळी अपमानही झाला आहे. तरीही ते पालीसारखेच पक्षाला चिकटले आहेत. का, ते त्यांचं त्यांनाच माहीत.

बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना ही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी, भांडणारी, चाळसंस्कृतीवाल्यांची शिवसेना राहिली नाही. ती सेटींगबाजांची, कॉलमबहाद्दुरांची आणि फोनाफोनी मास्टर पाकीटबाजांची शिवसेना झाली आहे. ती ‘चाळ व टाळ’; संस्कृतीपेक्षा ‘टॉवर आणि पॉवर’;च्या आहारी गेली आहे. केव्हा केव्हा तर ती पवारांच्याही आहारी गेली की काय, अशी शंका येते. त्यावर सोयीस्करपणे डोळेझाक करून महाराष्ट्रातील मराठी माणूस आशाळभूतपणे पाहतो तेव्हा त्याला जाणवतं की जसा लालबाग परळ हा मराठमोळा गिरणगावाचा प्रदेश परप्रांतीय धनदांडग्यांच्या हाती गेला, तसाच शिवसेना नावाचा मराठमोळ्यांच्या स्वाभिमानाचा, स्वामित्वाचा आणि हक्काचा पक्ष, संघटनेच्या चाकोरीतून बाहेर पडून धंदेवाईक नेत्यांच्या हाती सामावला आहे.

शिवसेना संपली नाही, पण तिची संपण्याकडे वाटचाल सुरू आहे. आदित्य ठाकरे जेव्हा आपला चुलत काका राज ठाकरे यांना शह देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांच्या राजकारणाची बालमती, अपरिपक्व बालबुद्धी सामोरी येते. परवा ठाण्याचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार एकाच शब्दात शिवसेनेची इज्जत काढून गेले. यू ट्युबला ते वाक्य सातत्याने हॅमर केलं जात आहे, ‘सुपारीबाज.. हप्तेखोर शिवसेना’. या शब्दातील खरंखोटं आम्हाला माहीत नाही, पण जेव्हा हा आमदार जबाबदारीपूर्ण जाहीरपणे असे उद्गार काढतो, तेव्हा त्यातील तथ्य समजून घ्यायला पाहिजे. शिवसेनेच्या नेत्यांनी, जिल्हाप्रमुखांनी, संपर्क प्रमुखांनी, अगदी युवासेना अध्यक्षांनी व पक्ष प्रमुखांनीही त्या शब्दांची दखल घेतलेली नाही. असे का? या प्रश्‍नाला उत्तर नाही. ते कोणी देऊही नये, घेऊही नये.

तूर्तास, या महाराष्ट्र प्रांतात ना शिवसेनेचा दबदबा उरला आहे, ना मनसेचा, ना राष्ट्रवादीचा, ना पवारांचा, ना चव्हाणांचा, ना काँग्रेसचा, ना आप चा, ना केजरीवालांचा. महाराष्ट्र आता अशा नेतृत्वाच्या आणि अशा पक्षाच्या प्रतिक्षेत आहे की जो या खर्‍या अर्थानं आम आदमीला म्हणजेच सर्वसामान्य मराठी माणसाला न्याय देईल.

Thursday, 13 March 2014


मराठी विश्वकोशच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. विजया वाड यांनी 'माझा महानगर'च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत करताना कार्यकारी संपादक राघवेंद्र नाथ द्विवेदी आणि वृत्त संपादक उन्मेष गुजराथी. 

Thursday, 6 March 2014

शिवसेनेत घराणेशाहीची परंपरा अबाधितच!


काँग्रेसवर हयातभर घराणेशाहीचा आरोप करीत राजकारण केलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतही बाहेरचे तर सोडाच; पण पुतण्याऐवजी मुलाला प्राधान्य दिले. 2010 चा दसरा मेळाव्यात तर, मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल तर विसरून जा, म्हणत नातवाला युवासेनाप्रमुखपदी बसविले. त्यासाठी विद्यार्थी सेना बासनात गुंडाळली. खरेतर गांधी घराण्याच्या घराणेशाहीला जनमान्यता मिळाली आहे. मात्र, शिवसेनाप्रमुखांनी आपले राजकीय वारसदार ठरविलेल्या उध्दव ठाकरे यांना अजूनही शिवसैनिक व जनतेचे शिक्कामोर्तब लाभलेले नाही. तेच उद्धव आता ’लोकशाही संपवून’ मनमानी तिकीटवाटप करीत सुटले आहेत.
----------------------

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने कल्याणमधूून एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत तर ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी देवू केली आहे. वास्तविक पाहता राजन विचारे हे मागील विधानसभेच्या निवडणुकीत केवळ 2 हजार मतांनी निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघात पाहिजे तसा जनसंपर्कही ठेवलेला नाही. ठोस कामंही केलेली नाहीत. तरीही मातोश्री व पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अंतर्गत राजकारणात त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. ज्या माणसाला विधानसभा निवडणूक जिंकताना नाकीनऊ येतात, त्यांना एकदम लोकसभेची लॉटरी कशी लागली, हे एक प्रश्‍नचिन्हच आहे. या मतदारसंघात आमदार प्रताप सरनाईक व इतरही उमेदवार होते. असे असताना विद्यमान पालकमंत्री गणेश नाईक यांच्याबरोबर सरनाईक व इतर तत्कालीन संभाव्य उमेदवारांचे संबंध असल्यामुळे तुल्यबळ उमेदवार न देता ही उमेदवारी विचारे यांना दिली यामुळे मातोश्रीवरूनच राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांच्या उमेदवारीवर जणू विजयाची मोहोरच उमटवली असल्याचे सिद्ध होते.

काँग्रेसमधील घराणेशाहीवर वारंवार टीका करणार्‍या शिवसेनेने ही परंपरा स्वतःच्या पक्षातही सुरु केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अशी घराणेशाहीची परंपरा असलेल्या या पक्षाने ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मुलाला तिकीट दिले आहे व घराणेशाहीची परंपरा जिवंत ठेवली आहे. वास्तविक पाहता, त्यांच्या मुलाला या मतदारसंघात कोण काळा कुत्राही विचारत नाही. त्याच्यासाठी हा मतदारसंघ नवखा आहे. कामाचा कुठलाही पुर्वानुभव नाही. तो पक्षाचा सदस्य आहे की नाही, याबाबतही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र केवळ शिंदेंच्या दादागिरीमुळे शिवसेनेतील पदाधिकारी, शिवसैनिक मूग गिळून गप्प आहेत. 

स्वतःच्या मुलाच्या विजयासाठी एकनाथ शिंदे आता धडपड करत आहेत. त्यामुळे सहाजिकच त्यांचे ठाणे मतदारसंघाकडे सपशेल दुर्लक्ष होणार आहे, यामुळे अर्थातच ठाण्याची जागा आपसुकच राष्ट्रवादीच्या पदरात पडणार आहे. वास्तविक पाहता, कल्याण मतदारसंघासाठी कल्याण जिल्हाप्रमुख (ग्रामीण) गोपाळ लांडगे यांचे नाव निश्‍चित करण्यात आले होते. मात्र या निष्ठावंत नेत्याच्या पदरी मातोश्रीने ऐनवेळेला धोंडाच टाकला. वास्तविक पाहता, शिंदे यांची पक्षावरील निष्ठा ही संशयास्पदच होती. अंतर्गत राजकारणाने त्रस्त असणार्‍या व अति महत्त्वाकांक्षा असणार्‍या शिंदे यांनी मध्यंतरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. इतकेच नव्हे तर याआधीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व शिंदे यांचे जन्मगाव ‘सातारा’ हे कनेक्शन वापरून त्यांची भेटही घेतली. यामुळे सेनेच्या वर्तुळात याबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली. तरीही ऐनवेळेला लांडगेंना डावलून शिंदे यांच्या मुलाची निवड करण्यात आली. 

एकीकडे आनंद परांजपे व गणेश नाईक यांच्या घराणेशाहीवर टीका करत मातोश्रीने अखेर शिंदे यांच्या मुलालाच उमेदवारी दिली आहे. यातूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांचा ढोंगी व मतलबीपणा दिसून येतो. निष्ठावंतांना लाथ मारण्याची परंपरा शिवसेनेने या निवडणुकीच्या उमेदवार प्रक्रियेतही पार पाडली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून संघटना वाढवणार्‍या मनोहर जोशींनाही याचा फटका बसला. जोशींना तिकीट देण्याऐवजी दक्षिण-मध्य मुंबईत राहुल शेवाळे यांना उमेदवारी देऊ केली आहे. शेवाळेंचे येथे कुठलेही ठोस काम नाही, मतदारसंघही नवीन आहे. मात्र केवळ जोशी यांना विरोध करण्यासाठी त्यांचे नाव सतत दोन-तीन वर्षांपासून प्रोजेक्ट करण्यात आले आहे. स्टँडिंग कमिटीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अगदी फालतू कामांनाही शिवसेनेच्या मुखपत्रातून दररोज  त्यांना अर्थपूर्ण प्रसिद्धी देण्यात आली. मात्र शेवाळे यांना जोशी यांची ही नाराजी चांगलीच भोवणार आहे. वास्तविक पाहता, शेवाळे हे मागील अणुशक्तीनगर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तरीही त्यांना पुन्हा लोकसभेसाठी उभे करून पंतांचा पत्ता जाणिवपूर्वक कट करण्यात आला. या निवडणुकीत शेवाळे पडणार हे जरी उघड असले तरी त्यांना पुन्हा आगामी विधानसभेचे तिकीट देण्याचे मातोश्रीने आश्‍वासन दिले आहे. अर्थात, यासाठी शेवाळे हे मातोश्री व सेनेतील इतर नेत्यांशी दिलखुलास अर्थपूर्ण संबंध ठेवून आहेत. एकंदरीतच ‘पतीव्रतेच्या पदरात धोंडा व वेश्येला मणिहार’ ही परंपरा शिवसेनेने आताही चालू ठेवली आहे.

शिवसेनेचे तथाकथित युवा नेते आदित्य ठाकरे हे यंदा प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. केवळ घराणेशाहीमुळे प्राधान्य मिळालेल्या या तथाकथित नेत्याला कुठल्याही कामाचा अनुभव नाही की त्यांनी साधी नगरसेवकाची निवडणुकही लढवलेली नाही. अशा अपरिपक्व युवकाच्या हाती शिवसेनेसारख्या बलाढ्य पक्षाची धुरा सोपवून उद्धव ठाकरे स्वतःच्या पायावर धोंडा तर मारतच आहेत शिवाय निष्ठावंत शिवसैनिकांच्या विश्‍वासाला तडा देत आहेत. आदित्य हे फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मिडियातून स्वतःची पद्धतशीरपणे प्रसिद्धी करत आहेत. त्यांच्या मागे कुठलेही कार्यकर्त्यांचे मोहोळ नाही. राजकारणाचा अभ्यास नाही, मात्र केवळ घराणेशाहीमुळे हे पक्षाची धुरा अत्यंत बेजबाबदारपणे हाताळत आहेत. अर्थात येत्या निवडणुकीत जनता याचे उत्तर देईलच. 
जय महाराष्ट्र!