Pages

Sunday, 18 May 2014

'मोदीलाटे'त दिसली मनसेची औकात

अपेक्षेप्रमाणे निकाल आला. काँग्रेस तोंडावर आपटली. मोदींवर गुजरात दंगलीचं बालंट थोपवून द्यायचं. आणि मुस्लिम मतदारांच्या जीवावर पुन्हा एकदा सत्तेत यायचं. हे काँग्रेसचं साधं सोपं गणित साफ चुकलं. भाजपा-शिवसेनेसारख्या पक्षांना कितीही जातीयवादी म्हणून हिणवलं तरी, हिंदू ही त्यांची व्होट बँक कधीच नव्हती. याउलट स्वत:ला सेक्युलर म्हणून मिरवणार्‍यांनीच कायम अल्पसंख्यांकांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेऊनच राजकारण केलं. जाती धर्माचं राजकारण हाच त्यांचा कायम विनिंग पॉईंट ठरला. पण यंदा असं झालं नाही.

यंदा राजकारणाचा ध्रुव बदलला. जाती-धर्मापेक्षा विकास महत्त्वाचा ठरला. गुजरातेत झालेल प्रगती आपल्याकडेही व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा होती. आणि म्हणूनच मोदी नावाची लाट आली. त्या लाटेत भले भले आडवे झाले. ज्यांनी ज्यांनी मोदींना विरोध केला ते सगळेच आपटले. सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरविणार्‍या काँग्रेसला पाच राज्यांत खातंही खोलता आलं नाही. आणि एकून सरासरी हिशेब करता त्यांची धाव अर्धशतकापर्यंतच सीमित राहिली.

का झालं हे असं? मोदींचा करिष्मा की आणखी काही. मोदींनी गुजरातेत जे करून दाखवलं ते कौतुकास्पदच. पण त्याहून जास्त महत्त्वाचं ठरलं ते काँग्रेसचं अपयश. अल्पसंख्याकांच लांगुलचन आणि गरीबाच्या तोंडावर नोट फेकून सत्तेत येता येतं हा माज काँग्रेसला नडला. नुसत्या निवडणुकीच्या तोंडावर सवलती जाहीर करायच्या. भरघोस आश्वासनं द्यायची. आणि पुन्हा सत्तेत येताच स्वत:ची तुंबडी भरत बसायची. हा काँग्रेसी उद्योग त्यांच्याच मुळावर आला. दहा वर्षांपुर्वी झालेल्या गुजरात दंगलीपलिकडे काँग्रेसच्या युवराजांकडे काही मुद्देच नव्हते. आम्ही सत्तेत आल्यास महिलांना सक्षम करू, म्हणताना आत्तापर्यंतच्या सत्तेत महिलांना काय दिलं या प्रश्‍नाचं उत्तर नव्हते. असंबंद्ध बोलणे किंबहुना बरळणं जनतेवर प्रभाव पाडू शकणार नाही, याची जाण नव्हती. कार्याचा किंवा व्यक्तीमत्त्वाचाही करिष्मा नव्हता. आता सेनापतीपतीच असा असल्यावर सेनेचं जे काही व्हायचं तेच काँग्रेसचं झालं. त्यांच्याबरोबरच त्यांचे मित्रपक्षही धुतले गेले. नरेंद्र मोदी काँग्रेससाठी कर्दनकाळ ठरले.

महाराष्ट्राभरही या मोदी फॅक्टरने बरेच चमत्कार घडवले. इथं भाजपा प्रबळ कधीच नव्हता आणि आजही नाही. मुंडे वगळता संपुर्ण महाराष्ट्रात ज्याचा प्रभाव पडू शकेल असा दुसरा कुणीच इथे आजही नाही. पण तरीदेखिल मोदी हवेत म्हणून भाजपाच्या अनेक उमेदवारांना जनतेने निवडून दिलं. विस्कळीत झालेल्या भाजपाला नवसंजीवनी मिळाली. शिवसेनेशी छुपा दगाफटका करण्याचा प्रयत्न करूनही महाराष्ट्रात भाजपा तरली ती केवळ मोदी फॅक्टरमुळे. याच मोदी फॅक्टरचा लाभ घ्यायचा प्रयत्न मनसेनेही केला, पण तो जाम फसला. राज ठाकरे सपशेल तोंडघशी पडले.

या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात बरीच उलथापालथ झाली. कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त जागा जिंकायच्याच या एकाच ध्यासानं वेडावलेल्या भाजपाने शिवसेनेलाही जेरीस आणलं. एका बाजूनं युती युती म्हणायचं आणि दुसर्‍या बाजूनं मनसेला चुकचुकारायचं असले उद्योग करून पाहिले. पडद्यामागे सेटलमेंट झाली. आणि मनसेने भाजप सोडून फक्त सेनेचे उमेदवार जिथे उभे आहेत तेथेच निवडणूक लढवली. मनसेचे हे नीच राजकारण महाराष्ट्राच्या जनतेने धुडकावून लावलं. आणि म्हणूनच गेल्या वेळी कित्येक ठिकाणी लाखभर मत खाऊन शिवसेनेला जेरीस आणणारी मनसे यावेळी मात्र सपशेल आपटली. त्याआधीही टोलप्रश्‍नी सेटलमेंट आंदोलन करून मनसेनं स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. आणि आता वडा आणि चिकन सूप जाहीर सभेत आणून जनाधार गमावला. काही ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं. मनसेचं इंजिन वेग घेण्याआधीच रूळांवरून घसरलं.

काँग्रेस राष्ट्रवादीचीही महाराष्ट्रात भलतीच वाट लागली. मनसेच्या ढाली आडून शिवसेनेवर टिका करणारी काँग्रेस मनसेबरोबरच आपटली. काँग्रेसला अशोक चव्हाण वगळता इतर कुणीच महाराष्ट्रात विजय मिळवून देऊ शकले नाही. गुरुदास कामत, मिलिंद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, निलेश नारायण राणे असे मी – मी म्हणणारे एक एक दिग्गज मातीमोल झाले. मुंबई पुन्हा एकदा भगवी झाली. कोकणात पुन्हा भगवा फडकला. ठाण्याचा गडही शिवसेनेने पुन्हा एकदा काबीज केला. कल्याणची सुभेदारी मिळवली. अर्थातच महाराष्ट्रातील प्रमुख अर्थ केंद्रे भगवी झाली. आणि त्याबरोबरच अवघा महाराष्ट्रही भगवा झाला. याचे श्रेय मोदी यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे यांनाही द्यायला हवे. उद्धव ठाकरे यांचे संघटना कौशल्य, पक्षावरील मजबूत पकड तसेच कार्यकर्त्यांच्या मनात शिवसेनेबद्दल अजूनही कायम असलेली आपुलकी यामुळेही हा लढा जिंकणे सोपे गेले. अनेक ठिकाणी बंडखोरी होऊनही सेनेने घवघवीत यश मिळवले.

काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रात मोजक्या ५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यात एक काँग्रेसची आणि ४ राष्ट्रवादीच्या. काँग्रेसच्या इतिहासात ही अशी नामुष्की पहिल्यांदाच ओढवली असावी. आतातरी हे असं का झालं? आपण कुठे कमी पडलो याचा काँग्रेसने विचार केला नाही, तर भविष्यातली परिस्थिती याहून वाईट असेल. मोदींच्या घोषणेप्रमाणे काँग्रेसमुक्त भारताची ती नांदी असेल.

अर्थात या मिळालेल्या विजयाने भाजपा आणि मित्रपक्षाने हुरळून जाण्याचं कारण नाही. आत्ताशा नरेंद्र मोदी हे काँग्रेसचे कर्दकाळ म्हणून पुढे आले आहेत. पण सद्यस्थितीत देशासमोर असलेल्या समस्या आणि भ्रष्टाचारात आकंठ बुडलेली नोकरशाही यातून मार्ग काढत देशवासीयांच्या अपेक्षा पुर्ण करणं खुद्द मोदींनाही तेवढं सोपं जाणार नाही. त्यातच भाजपा अंतर्गत दुफळीलाही त्यांना तोंड द्यावे लागणार नाही. अधूनमधून अपशकून करणार्‍या ज्येष्ठांना सांभाळत सरकार चालवणं म्हणजे नेमकी काय कसरत आहे, याची मोदींना चांगलीच कल्पना असेल.

त्यामुळे जनतेनेही आता धीर धरायला हवा. मोदी पंतप्रधान झाले म्हणजे लगेच चमत्कार होतील अशी अपेक्षा बाळगण्यात काहीच हशील नाही. मात्र इतर देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र बदलेल हे निश्चित. सद्यस्थितीत भारताला खंबीर तारणहाराची गरज आहे. नरेंद्र मोदी ही जबाबदारी पार पाडतील का, याचं उत्तर आता भारताला हवंय. 

Saturday, 12 April 2014

अजून किती विटंबना?

लडकोंसे गलती हो जाती हैम्हणत परवाच सपाच्या मुलायमसिह यादवांनी आपल्या निर्दयी काळजाचं दर्शन घडवलंशक्ती मिल बलात्कार प्रकरणात तीन युवकांना झालेली फाशीची शिक्षा त्यांना भलतीच झोंबली असावीएखाद्या प्रकरणात इतक्या झटपट निकाल लागलाआणि त्यातही इतक्या कठोर शिक्षा होऊ लागल्या तर यांच्या बगलबच्च्यांचं काय होणारया चिंतेने त्यांना ग्रासलंयम्हणूनच सत्तेवर आल्यास बलात्कार करणाऱ्यांना  फाशी देणारा कायदाच रद्द करण्याची घोषणाही त्यांनी केली.

मुलांकडून तारूण्याच्या भरात होतात चुकामान्यपण त्याच्या चुकांची शिक्षा मुलींनी का आयुष्यभर भोगायचीआणि तेही तीच चुका (गुन्हा नव्हे?) करणारी मुलं उजळ माथ्याने आजुबाजूला फिरत असतानाया विचार मुलायमसिंहांच्या मनात आला नाही काका एवढा विचार करण्याची त्यांची कुवतच नाहीनिवडणुकीच्या रणधुमाळीत लक्ष वेधून घेण्याची या असल्या राजकरण्यांना कायम गरज भासतेपण त्यासाठी इतक्या हीन पातळीवर जाण्याची काय गरज?

आणि त्यातही योगायोग म्हणा किंवा हेतुपुरस्सरमुलायमसिंहांनी संदर्भ दिलाय तो शक्ती मिल बलात्कार प्रकरणाचाखरंतरं बलात्काऱ्यांना फाशीच व्हावीही मागणी जोर धरू लागली ती निर्भया प्रकरणानंतरत्यावेळच्या जनरेट्यामुळे सरकारला अशा गुन्ह्यांसाठी कठोर कारवाईची तरतूद करावी लागलीया प्रकरणातही चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेलीपण तेव्हा मुलायमसिंह काहीच बोलले नाहीतेव्हा त्यांना त्या चार जणांचा कैवार घ्यावा असे वाटले नाहीपण शक्ती मिल प्रकरणात तिघांना फाशी सुनावल्यावर मात्र त्यांना गहिवर दाटून आलाशक्ती मिल प्रकरणातील आरोपींची नावं आणि निवडणुकीची हवा याची सांगड घातली तर या करूणेमागचं कारण सहज स्पष्ट होईल.

अर्थात कालपर्यंत ही केवळ शंकाच होतीपण मुलायमसिंह यादवांचे महाराष्ट्रातील चेले अबू आझमी यांनी काल जे अकलेचे तारे तोडले त्यावरून हा संशय अधिकच बळावलाविवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेबरोबरच बलात्कार झालेल्या महिलेलाही फाशीची शिक्षा द्यायला हवीअशी मुक्ताफळं त्यांनी उधळलीवाह रे वाम्हणजे मुलं चुकतात म्हणून त्यांना सोडून द्यायचंआणि त्यांच्या चुकांची तक्रार केली म्हणून मुलींना फासावर चढवायचंहा यांचा न्यायआणि त्याला आधार म्हणून इस्लामचा कायदाइस्लाम मध्ये सांगितलंय म्हणे ! काय बदनामी चालवली आहे स्वत:च्याच धर्माची!

आज ज्यांच्यावर बलात्कार होत आहेतत्या मुली सात महिन्यांपासून सत्तर वर्षांच्या आहेतत्यातल्या निर्भया आणि गुडिया सारख्या कित्येक निष्पाप मुली सामुहिक बलात्काराचा भार सहन न झाल्याने जीव गमावून बसल्या आहेतत्यांना तुम्ही फाशी देणार?

कुठेही बलात्कारांच्या घटनांविरोधात आवाज उठायला लागला कीमुलींचे कपडेच आक्षेपार्ह होतेमुली कशाला रात्री-अपरात्री हिंडतातमुलीच बलात्काऱ्यांना उद्युक्त करतातअसली काहीतरी बेपर्वा विधानं करून चर्चेचा ओघ आपल्याकडे वळवायचा आणि मुळ मुद्याला फाटा फोडायचा असलं करंटे उद्योग आपल्याकडे नेहमीच चालतातपण सात – आठ महिन्यांच्या बालिकांनी असं काय आक्षेपार्ह केलं होतंयाचं उत्तर देणं मात्र सोयीस्कर टाळतातनिर्भया प्रकरणात तर एका स्वयंघोषित संतानं कळसच केला होतातीनं त्या मुलांना भैया म्हणून विनवणी करायला हवी होतीत्यांनी तिला सोडून दिलं असतंतिने त्यांना प्रतिकार करायचा प्रयत्न केला ही तिचीच चुकअसं जाहीर करून टाकलं. (अर्थात हाच थोर संत नंतर स्वत:च बलात्काराच्या आरोपावरून तुरूंगात गेला हा भाग वेगळा.) तर अजून एका थोर बापूंनी बलात्काऱ्यांपासून रक्षणासाठी स्वत:च्या नावाची चालिसाच जपायला सांगितली.

बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याविषयी इतकी टोकाची असंवेदनशील व्यक्तव्ये करूनही यापैकी कुणाचंच समाज काहीच बिघडवू शकला नाहीहे विशेषचार दिवस बातम्या आल्या आणि गेल्यामहिलांची सुरक्षा तशीच टांगणीली लागलेलीअब्रुचे धिंडवडे रोजचेचएकूणच महिला कितीही शिकल्या-सवरल्या तरी त्यांना स्वत:चा ठाम आवाज नाहीहे सगळ्यांनीच जाणलंआणि म्हणूनच निवडणुकीत मतांची बेगमी करण्यासाठीएका गटाला खुश करण्यासाठी देशातल्या ५० टक्के मतदार असलेल्या महिलांच्या जखमेवरील खपली काढली गेली.

आरोपींचा कड घेतानाआपण पिडीतांचा अपमान करतो आहोत याची चाड बागळण्याची गरज उरली नाहीआरोपीला केवळ आरोपी म्हणूनच बघायला हवंत्याचा जातप्रांतधर्म बघू नयेपण दुर्दैवाने आपल्याकडे तसे होत नाहीनिवडणुकाजवळ आल्या की विशिष्ट गटाला खुश करण्यासाठी वाट्टेल त्या तडजोडी केल्या जातातआणि त्याचं कुणालाचं काही वाटत नाही.

साड्या वाटल्या नि हळदीकुंकुचा घाट घातला की बायका खुशयापलीकडे काही विचार करायची गरज उरली नाहीमहिलांच्या नावावर अनेक योजना आल्या आणि गेल्याअनेकांनी संघटना काढल्या - चालवल्याआंदोलने किली आणि संपवलीपण अजुनही महिलांना समान हक्क तर सोडाचसन्मानानं जगण्याचा  हक्कही मिळाला नाहीतिची विटंबना कायमच राहिली.
  


Saturday, 22 March 2014

शिवसेनेच्या घराचे फिरले वासे

सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी बिगुल वाजले, सैन्य तैनात झाले आणि रणांगणावर शूरवीर, योद्धे यांची जमवाजमव सुरू झाली तेव्हा अनेकांना कळले की आपल्या पायाखालची वाळू निसटते आहे. ती वाळू आहे की माती? पाय सटकताहेत की ओढले जाताहेत? बरं, ते नेमके कोण ओढताहेत? परकीय की स्वकीय? शत्रूपक्षातील कार्यकर्ते आहेत का हे पाय ओढणारे की आपल्याच गोटातले आपलेच पाय आजवर चाटणारे आपलेच लोक आहेत? या संभ्रमात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते विरोधकांवर कशा प्रकारे कुरघोडी काढता येईल, याचा विचार करत आहेत.

महाराष्ट्र प्रांतात तुर्तास तरी रणांगणावर उधाण आले आहे महाराजा, आणि यात कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार. कोणी बघता बघता गल्लीतून दिल्लीत जाणार तर कोणी दिल्लीचे स्वप्न पाहता पाहता तुरुंगात खितपत पडणार. काळ सर्वात मोठा विश्‍लेषक असतो. त्याच्याकडे सर्व रोगांवर, आजारांवर उपाय आहे. तो वेळच्या वेळी सारं घडवतो, तोच पसारा मांडतो आणि तोच सारं मोडून तोडून मोकळा होतो. त्याच्या तडाख्यात सापडलेले मग राजकीय आणि सामाजिक पटलावरूनही नाहिसे होतात. महाराष्ट्रात सध्या अशी प्रकरणे वाढीस लागली आहेत. निमित्त आहे ते निवडणुकांचे. पण सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या सट्टाबाजारात दिल्लीत कोणाचे सरकार आणि महाराष्ट्रातून कोणाचे किती उमेदवार, यावर हा खेळ भरकटतो आहे.

या वावटळीत 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण अशा वल्गना करणार्‍या शिवसेनेचे पानिपत होत आहे. शिवसेना सोडून खासदार, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते दूर जात आहेत. आजवर ते आपल्याकडे होते तेव्हा त्यांचे गुण-अवगुण दिसले नाहीत. पण ते सोडून जाताच ते गद्दार होते, असा साक्षात्कार शिवसेनेतील धेंडांना लागला आहे. मुळात शिवसेना आता बाळासाहेबांच्या निधनानंतर ‘पोरकी’ व सर्वसामान्य शिवसैनिकांना ‘परकी’च झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नेभळट आणि बालिश असल्याची टीका हा पक्ष सोडून परपक्षात प्रवेश घेणार्‍या माजी शिवसैनिकांनी केली आहेच. यंदाची लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी महायुती सज्ज असल्याचा दावा केला जातो आहे, ती महायुती आतून किती पोखरली आहे, ते न दिसण्याएवढे मतदार दुधखुळे नाहीत. महागाई, भ्रष्टाचार, सुरक्षितता वगैरे तेच तेच पठडीतले मुद्दे घेऊन केंद्रात बदल घडवण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती प्रयत्न करणार, असे चित्र उभे केले जात आहे.

पण मध्यंतरी शिर्डीतून खासदार भाऊसाहेब वाघचौरे शिवसेना सोडून गेले, शिर्डीतून उमेदवारी मिळालेले बबनराव घोलप यांना तर 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. साईबाबांची शिर्डी शिवसेनेला यंदा तरी धार्जिणी नाही. पण मुख्य मुद्दा असा आहे की, भष्टाचारी बबनराव घोलप यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगवास होतो, तोही त्यांनी 1999 मध्ये महाराष्ट्रातील युती सरकारच्या काळात केलेला असतो, त्यावेळी ते समाजकल्याण मंत्री असतात, गेली 14 वर्षे त्या भ्रष्टाचार प्रकरणाचा ससेमिरा त्यांच्या मागे असतो, अशा वेळी, अशा काळात शिवसेनेचे दिग्गज नेते, जे भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवण्याच्या पोकळ गर्जना शिवतीर्थावर आणि दादरच्या शिवसेना भवनातून देतात, त्यांना यंदा जनतेसमोर तोच मुद्दा घेऊन येण्यास कुठले तोंड उरले आहे? अण्णा हजारे यांनी वारंवार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा यांच्या नेत्यांची पाळेमुळे खोदून त्यांच्या भ्रष्टाचारी प्रकरणाची अगदी पुराव्यांसकट तक्रार केली होती. त्यात त्यांची कितीतरी वर्षे खर्ची पडली. त्यापैकी काही नेत्यांवर कारवाई झाली, काही जण मोकळे सुटले, काहीजणांना पक्षाने पदराआड घेऊन बचाव केला. काही ठिकाणी अण्णाच उघड पडले तर काही ठिकाणी भ्रष्टाचारी नेत्यांपेक्षा पक्षाची नाचक्की झाली. असे हे खेळ बरेच रंगले या काळात.

पण जेव्हा बबनराव घोलपांचा घोळ समोर आला तेव्हा मात्र शिवसेना नेते संभावितासारखे वागू लागले. त्यांनी आपल्या मतदारांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात शिवसेना आपले उमेदवार उभे करून लोकसभेसाठी इतर राज्यातही आपण सज्ज असल्याचा देखावा उभा करण्यात मशगुल झाले होते. मघाशी म्हटले त्याप्रमाणे शिवसेनेच्या पायाखालची वाळू निसटत चालली आहे. अशावेळी जुनी जाणती अनुभवी माणसं त्यांना नकोशी झाली आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. भाऊसाहेब वाघचौरे, उदय दुधगावकर, आनंद परांजपे, गजानन बाबर, राहुल नार्वेकर, मोहन रावले, अभिजीत पानसे, रवींद्र माने, त्याआधी भास्कर जाधव, राज ठाकरे, नारायण राणे, सतीश प्रधान, गणेश नाईक, छगन भुजबळ असा इतिहास आहे, या मंडळींनी शिवसेना सोडली व इतर पक्षांची कास धरली. प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे यांच्यासह मिलिंद नार्वेकर यांचेही नाव पुढे यायचे. याच मिलिंद नार्वेकरमुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली, असे सगळेजण खासगीत आणि जाहीरपणे सांगतात. त्या मिलिंदचे नक्की काय साटेलोटे आहे, ते एकदा बाहेर आले पाहिजे. शिवसेनेच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना, सर्वसामान्य नागरिकांना हा मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्यात आडकाठी का घालतो, त्याचा काय स्वार्थ आहे ही विवंचना कायम आहे. एकदा तरी मिलिंद नार्वेकर नावाच्या त्या झारीतील शुक्राचार्याने आपली भूमिका स्पष्ट करावी. उद्धव ठाकरे यांना हे तमाशे शिवसेनेत चालतातच कसे? ते मिलिंदला याचा जाब का विचारत नाहीत, त्याच्यावर कारवाई का करत नाहीत? पण केव्हातरी याही नार्वेकराला शिवसेनेतून जावे लागेल, असे जुनेजाणते व अन्यायग्रस्त शिवसैनिक खासगीत पण तीव्र संतापाने सांगत असतात.

आता तर बबनराव घोलपांना पक्षातून कायमस्वरूपी काढावेच लागेल. कारण, त्यांची आमदारकी तर जाणारच आणि लोकसभेची उमेदवारीही. हे असे फटके आणि धक्के शिवसेनेला केवळ लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीपूर्वीच बसले आहेत, असे नाही. त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आणि अगदी पोटनिवडणुकीपूर्वीही बसले आहेत. त्यातूनही पक्ष प्रमुख काहीच बोध घेत नाहीत. ते आपल्याच नादात, आपल्याच विश्‍वात, आपल्याच कुटुंबात, आपल्याच छंदात मग्न असतात, असे दिसल्यावर कार्यकर्ते चिडणार नाहीत तर काय! मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची त्यांचे सध्याचे पक्षश्रेष्ठी कसा हिरमोड करतात ते सगळेजण रोजच्या रोज अनुभवत आहेत. तरीही अडवाणी अधूनमधून हट्टीपणा करून आपले हित साधतात, पण मनोहर जोशी तर पार तळाला फेकले गेले आहेत. वयाची 80 आली तरी त्यांना राजकारणाचा मोह सुटलेला नाही. काहीही करा, पण मला संसदेत पुढच्या किंवा मागच्या दाराने पाठवा, अशी आर्जव करणार्‍या पंतांचा तर सेनेत वेळोवेळी अपमानही झाला आहे. तरीही ते पालीसारखेच पक्षाला चिकटले आहेत. का, ते त्यांचं त्यांनाच माहीत.

बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना ही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी, भांडणारी, चाळसंस्कृतीवाल्यांची शिवसेना राहिली नाही. ती सेटींगबाजांची, कॉलमबहाद्दुरांची आणि फोनाफोनी मास्टर पाकीटबाजांची शिवसेना झाली आहे. ती ‘चाळ व टाळ’; संस्कृतीपेक्षा ‘टॉवर आणि पॉवर’;च्या आहारी गेली आहे. केव्हा केव्हा तर ती पवारांच्याही आहारी गेली की काय, अशी शंका येते. त्यावर सोयीस्करपणे डोळेझाक करून महाराष्ट्रातील मराठी माणूस आशाळभूतपणे पाहतो तेव्हा त्याला जाणवतं की जसा लालबाग परळ हा मराठमोळा गिरणगावाचा प्रदेश परप्रांतीय धनदांडग्यांच्या हाती गेला, तसाच शिवसेना नावाचा मराठमोळ्यांच्या स्वाभिमानाचा, स्वामित्वाचा आणि हक्काचा पक्ष, संघटनेच्या चाकोरीतून बाहेर पडून धंदेवाईक नेत्यांच्या हाती सामावला आहे.

शिवसेना संपली नाही, पण तिची संपण्याकडे वाटचाल सुरू आहे. आदित्य ठाकरे जेव्हा आपला चुलत काका राज ठाकरे यांना शह देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांच्या राजकारणाची बालमती, अपरिपक्व बालबुद्धी सामोरी येते. परवा ठाण्याचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार एकाच शब्दात शिवसेनेची इज्जत काढून गेले. यू ट्युबला ते वाक्य सातत्याने हॅमर केलं जात आहे, ‘सुपारीबाज.. हप्तेखोर शिवसेना’. या शब्दातील खरंखोटं आम्हाला माहीत नाही, पण जेव्हा हा आमदार जबाबदारीपूर्ण जाहीरपणे असे उद्गार काढतो, तेव्हा त्यातील तथ्य समजून घ्यायला पाहिजे. शिवसेनेच्या नेत्यांनी, जिल्हाप्रमुखांनी, संपर्क प्रमुखांनी, अगदी युवासेना अध्यक्षांनी व पक्ष प्रमुखांनीही त्या शब्दांची दखल घेतलेली नाही. असे का? या प्रश्‍नाला उत्तर नाही. ते कोणी देऊही नये, घेऊही नये.

तूर्तास, या महाराष्ट्र प्रांतात ना शिवसेनेचा दबदबा उरला आहे, ना मनसेचा, ना राष्ट्रवादीचा, ना पवारांचा, ना चव्हाणांचा, ना काँग्रेसचा, ना आप चा, ना केजरीवालांचा. महाराष्ट्र आता अशा नेतृत्वाच्या आणि अशा पक्षाच्या प्रतिक्षेत आहे की जो या खर्‍या अर्थानं आम आदमीला म्हणजेच सर्वसामान्य मराठी माणसाला न्याय देईल.

Thursday, 13 March 2014


मराठी विश्वकोशच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. विजया वाड यांनी 'माझा महानगर'च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत करताना कार्यकारी संपादक राघवेंद्र नाथ द्विवेदी आणि वृत्त संपादक उन्मेष गुजराथी. 

Thursday, 6 March 2014

शिवसेनेत घराणेशाहीची परंपरा अबाधितच!


काँग्रेसवर हयातभर घराणेशाहीचा आरोप करीत राजकारण केलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतही बाहेरचे तर सोडाच; पण पुतण्याऐवजी मुलाला प्राधान्य दिले. 2010 चा दसरा मेळाव्यात तर, मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल तर विसरून जा, म्हणत नातवाला युवासेनाप्रमुखपदी बसविले. त्यासाठी विद्यार्थी सेना बासनात गुंडाळली. खरेतर गांधी घराण्याच्या घराणेशाहीला जनमान्यता मिळाली आहे. मात्र, शिवसेनाप्रमुखांनी आपले राजकीय वारसदार ठरविलेल्या उध्दव ठाकरे यांना अजूनही शिवसैनिक व जनतेचे शिक्कामोर्तब लाभलेले नाही. तेच उद्धव आता ’लोकशाही संपवून’ मनमानी तिकीटवाटप करीत सुटले आहेत.
----------------------

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने कल्याणमधूून एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत तर ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी देवू केली आहे. वास्तविक पाहता राजन विचारे हे मागील विधानसभेच्या निवडणुकीत केवळ 2 हजार मतांनी निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघात पाहिजे तसा जनसंपर्कही ठेवलेला नाही. ठोस कामंही केलेली नाहीत. तरीही मातोश्री व पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अंतर्गत राजकारणात त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. ज्या माणसाला विधानसभा निवडणूक जिंकताना नाकीनऊ येतात, त्यांना एकदम लोकसभेची लॉटरी कशी लागली, हे एक प्रश्‍नचिन्हच आहे. या मतदारसंघात आमदार प्रताप सरनाईक व इतरही उमेदवार होते. असे असताना विद्यमान पालकमंत्री गणेश नाईक यांच्याबरोबर सरनाईक व इतर तत्कालीन संभाव्य उमेदवारांचे संबंध असल्यामुळे तुल्यबळ उमेदवार न देता ही उमेदवारी विचारे यांना दिली यामुळे मातोश्रीवरूनच राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांच्या उमेदवारीवर जणू विजयाची मोहोरच उमटवली असल्याचे सिद्ध होते.

काँग्रेसमधील घराणेशाहीवर वारंवार टीका करणार्‍या शिवसेनेने ही परंपरा स्वतःच्या पक्षातही सुरु केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अशी घराणेशाहीची परंपरा असलेल्या या पक्षाने ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मुलाला तिकीट दिले आहे व घराणेशाहीची परंपरा जिवंत ठेवली आहे. वास्तविक पाहता, त्यांच्या मुलाला या मतदारसंघात कोण काळा कुत्राही विचारत नाही. त्याच्यासाठी हा मतदारसंघ नवखा आहे. कामाचा कुठलाही पुर्वानुभव नाही. तो पक्षाचा सदस्य आहे की नाही, याबाबतही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र केवळ शिंदेंच्या दादागिरीमुळे शिवसेनेतील पदाधिकारी, शिवसैनिक मूग गिळून गप्प आहेत. 

स्वतःच्या मुलाच्या विजयासाठी एकनाथ शिंदे आता धडपड करत आहेत. त्यामुळे सहाजिकच त्यांचे ठाणे मतदारसंघाकडे सपशेल दुर्लक्ष होणार आहे, यामुळे अर्थातच ठाण्याची जागा आपसुकच राष्ट्रवादीच्या पदरात पडणार आहे. वास्तविक पाहता, कल्याण मतदारसंघासाठी कल्याण जिल्हाप्रमुख (ग्रामीण) गोपाळ लांडगे यांचे नाव निश्‍चित करण्यात आले होते. मात्र या निष्ठावंत नेत्याच्या पदरी मातोश्रीने ऐनवेळेला धोंडाच टाकला. वास्तविक पाहता, शिंदे यांची पक्षावरील निष्ठा ही संशयास्पदच होती. अंतर्गत राजकारणाने त्रस्त असणार्‍या व अति महत्त्वाकांक्षा असणार्‍या शिंदे यांनी मध्यंतरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. इतकेच नव्हे तर याआधीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व शिंदे यांचे जन्मगाव ‘सातारा’ हे कनेक्शन वापरून त्यांची भेटही घेतली. यामुळे सेनेच्या वर्तुळात याबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली. तरीही ऐनवेळेला लांडगेंना डावलून शिंदे यांच्या मुलाची निवड करण्यात आली. 

एकीकडे आनंद परांजपे व गणेश नाईक यांच्या घराणेशाहीवर टीका करत मातोश्रीने अखेर शिंदे यांच्या मुलालाच उमेदवारी दिली आहे. यातूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांचा ढोंगी व मतलबीपणा दिसून येतो. निष्ठावंतांना लाथ मारण्याची परंपरा शिवसेनेने या निवडणुकीच्या उमेदवार प्रक्रियेतही पार पाडली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून संघटना वाढवणार्‍या मनोहर जोशींनाही याचा फटका बसला. जोशींना तिकीट देण्याऐवजी दक्षिण-मध्य मुंबईत राहुल शेवाळे यांना उमेदवारी देऊ केली आहे. शेवाळेंचे येथे कुठलेही ठोस काम नाही, मतदारसंघही नवीन आहे. मात्र केवळ जोशी यांना विरोध करण्यासाठी त्यांचे नाव सतत दोन-तीन वर्षांपासून प्रोजेक्ट करण्यात आले आहे. स्टँडिंग कमिटीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अगदी फालतू कामांनाही शिवसेनेच्या मुखपत्रातून दररोज  त्यांना अर्थपूर्ण प्रसिद्धी देण्यात आली. मात्र शेवाळे यांना जोशी यांची ही नाराजी चांगलीच भोवणार आहे. वास्तविक पाहता, शेवाळे हे मागील अणुशक्तीनगर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तरीही त्यांना पुन्हा लोकसभेसाठी उभे करून पंतांचा पत्ता जाणिवपूर्वक कट करण्यात आला. या निवडणुकीत शेवाळे पडणार हे जरी उघड असले तरी त्यांना पुन्हा आगामी विधानसभेचे तिकीट देण्याचे मातोश्रीने आश्‍वासन दिले आहे. अर्थात, यासाठी शेवाळे हे मातोश्री व सेनेतील इतर नेत्यांशी दिलखुलास अर्थपूर्ण संबंध ठेवून आहेत. एकंदरीतच ‘पतीव्रतेच्या पदरात धोंडा व वेश्येला मणिहार’ ही परंपरा शिवसेनेने आताही चालू ठेवली आहे.

शिवसेनेचे तथाकथित युवा नेते आदित्य ठाकरे हे यंदा प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. केवळ घराणेशाहीमुळे प्राधान्य मिळालेल्या या तथाकथित नेत्याला कुठल्याही कामाचा अनुभव नाही की त्यांनी साधी नगरसेवकाची निवडणुकही लढवलेली नाही. अशा अपरिपक्व युवकाच्या हाती शिवसेनेसारख्या बलाढ्य पक्षाची धुरा सोपवून उद्धव ठाकरे स्वतःच्या पायावर धोंडा तर मारतच आहेत शिवाय निष्ठावंत शिवसैनिकांच्या विश्‍वासाला तडा देत आहेत. आदित्य हे फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मिडियातून स्वतःची पद्धतशीरपणे प्रसिद्धी करत आहेत. त्यांच्या मागे कुठलेही कार्यकर्त्यांचे मोहोळ नाही. राजकारणाचा अभ्यास नाही, मात्र केवळ घराणेशाहीमुळे हे पक्षाची धुरा अत्यंत बेजबाबदारपणे हाताळत आहेत. अर्थात येत्या निवडणुकीत जनता याचे उत्तर देईलच. 
जय महाराष्ट्र!


Wednesday, 26 February 2014

पत्रकार संघटना झोपल्यात का?


स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कट्टर अनुयायी, सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक, हिंदूमहासभेचे ज्येष्ठ नेते, ‘प्रज्वलंत’चे संपादक विक्रमराव सावरकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. एक प्रखर हिंदुत्त्ववादी झंझावात शांत झाला. या अनपेक्षित बातमीने धक्काच बसला. पण त्याहूनही अधिक धक्का बसला तो ही बातमी देणार्‍या मिडियाच्या उदासीनतेचा. सगळ्याच प्रमुख वृत्तपत्रांनी केवळ दहा ओळींची बातमी देऊन आपली जबाबदारी संपवली. 'सावरकरांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांचे निधन.' एवढाच आशय? इतर वेळी जरा काही खट्टू झाले की चार पानी पुरवणी आणि पानभर फोटोंचे दळण दळणारी वृत्तपत्रे अचानक कशी गप्पगार झाली? काहीही घडले न घडले तरी दंडुके घेऊन फिरणारी इलेक्ट्रॉनिक मिडियावाली मंडळी कुठे गायब झाली? विक्रमरावांचे कार्य, त्यांचे समाजाप्रती योगदान, त्याचे विचार अशा कितीतरी सांगण्यासारख्या गोष्टी असताना सगळ्यांनीच सोयीस्कर मौन का पाळले?

सावरकरांचे पुतणे एवढंच काही विक्रमरावांचं कर्तृत्त्व मर्यादित नव्हतं. हिंदू संघटनांच्या कार्यळे हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी देशभर हिंडून अखंड हिंदुस्थान, समान नागरी कायदा, हिंदूंचे हितरक्षण आदींसाठी काम केले. मुंबई महानगर पालिकेत ‘वंदे मातरम्’ हे देशभक्ती गीत म्हणावे यासाठी मोर्चा काढला. तसेच विधानसभेत चर्चा घडवून आणली. भिवंडी येथे शिवजयंती मिरवणूक निघाली, मलंग गडावर हिंदूंसाठी असलेली पूजा करण्याची बंदी दूर व्हावी यासाठीही त्यांनी आंदोलन केले. स्वातंत्र्ङ्मवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून विक्रम सावरकर यांनी मुरबाड, जिल्हा-ठाणे येथे ‘महाराष्ट्र सैनिकी विद्यालय’ सुरू केले होते. आजारपणामुळे सार्वजनिक आणि सामाजिक जीवनातून निवृत्ती घेतल्यानंतर ते या शाळेचा आकारात गेल्या काही वर्षांपासून रहात होते. मुरबाडमधील याच शाळेत त्यांनी शेवटचा श्वास घेतला. विक्रमराव सावरकरांचे निधन कधी कुठे कसे झाले, हे जरी आजच्या प्रसारमाध्यमांनी जनतेपर्यंत पोहोचवले असते तरी त्यांच्या या एका कार्याचा परिचय जनतेला झाला असता. पण दुर्दैवाने अनेकांनी तेवढीसुद्धा तसदी घेतली नाही.

अनुल्लेखात अनादर : 
‘सावरकर यांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी दादर येथील निवासस्थानी गर्दी केली होती.’ बहुतेक वृत्तपत्रांनी याच एका स्टिरीओटाईप वाक्याने बातमी अक्षरश: संपवली. या एका वाक्यात त्यांनी महाप्रचंड हिंदू जनसमुदायाच्या नेत्याला एका छोट्या संघटनेशी बांधून टाकलं. त्याचं कर्तृत्व दडपलं.

मोदी समान नागरी कायदा आणण्याची घोषणा करतात, म्हणून ते हिरो. पण उभं आयुष्य याच कायद्यासाठी जनजागृती करणार्‍यासाठी वेचणार्‍या विक्रमरावांची दखलही घ्यायची नाही, हा दुटप्पीपणा कशासाठी?
सावरकर हिंदूत्त्ववादी होते. मात्र त्याहूनही अधिक ते वास्तवदर्शी होते. भविष्यात हिंदू अल्पसंख्य होतील, म्हणून प्रत्येक हिंदू दाम्पत्याने पाच मुले जन्माला घालावीत. असल्या हास्यास्पद कल्पना त्यांनी मांडल्या नाहीत. सन 1998च्या प्रज्वलंत दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ पाहा. ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब, राष्ट्रीय कुटुंब’ हाच त्यांचा नारा आहे.
राष्ट्रवादाच्या आड येणारा हिंदुत्त्ववाद त्यांनी कधीच मांडला नाही. तरीही तथाकथित धर्मनिरपेक्षवाद्यांनी त्यांनी आयुष्यभर अहवेलनाच केली.

प्रसिद्धीपराड़मुख : 
अर्थात कुणी मान सन्मान द्यावा, अशी सावरकरांची अपेक्षाच नव्हती. प्रसिद्धीची हौस नव्हती. त्यांच्यातील गुणसंपदा जाणणार्‍यांना आणि त्यांच्या काही मित्रांना वाटे, ठयांनी जरा तडजोड केली असती तर ते कुठल्याकुठे पोचले असते! म्हणजे उच्चपदी विराजमान झाले असते, प्रकाशझोतात राहिले असते. संपन्न आयुष्य जगले असते. रोज हारतुरे गळ्यात पडले असते. उपेक्षेचं विष असं जन्मभर प्यावं लागलं नसतं.ठ पण विक्रमरावांनी कधीच असल्या सगळ्या गोष्टींच्या मागे गेले नाहीत. हारतुरे, सन्मान, स्वार्थ यांचा विचार मनात होताच कुठे? देशहिताच्या कृतीचाच आग्रह होता. जे जे देशहितविरोधी, त्याला त्याला विरोध करण्याचीच शपथ होती. ‘वरं जनहितं ध्येयम्’ हाच बाणा होता आणि त्या कर्तव्यपूर्तीचं समाधान हेच त्यांच्या लेखी सर्वश्रेष्ठ आणि सर्वतोपरी होतं.

नवी पिढी अनभिज्ञ :
मात्र त्यांच्या या प्रसिद्धीपराड़मुख वृत्तीमुळेच बहुदा नवी पिढी त्यांच्या कार्यापासून अनभिज्ञ राहिलेली दिसते. कारण एरवी कुठलीही बातमी पारंपरिक मिडियाने दाबली तरी सोशल
मिडियावर पसरतेच. विक्रमरावांच्या बाबतीत तेही घडलं नाही. खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच आज समाजात असंख्य गैरसमज आहेत. असे असताना विक्रमरावांना न्याय मिळणं कठीणंच. सावरकरवादी म्हणजे कुणी तरी अतिजहाल, प्रतिगामी असा एक सुप्त मतप्रवाह आज समाजात आहे. गांधी हत्येनंतरही गांधीचं उदात्तीकरण झालं. पण सावरकरांचे विचारसुद्धा लोकांपर्यंत जसेच्या तसे पोहचू शकले नाहीत. त्यामुळे ज्यांना सावरकरांबद्दल आदर आहे, त्यांना सुद्धा ‘सागरा प्राण तळमळला...’च्या पलीकडे काही सांगता येत नाही अशी आजची स्थिती आहे. किंबहुना खरे सावरकर जनसामान्यांपर्यंत पोहचू नयेत, अशीच आजची योजना आहे. एरवी स्थानिक पुढारी किंवा भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या जयंती/ मयंती निमित्त सगळीच वृत्तपत्रे चार-आठ पानी पुरवणी काढतात. पण विामरावांच्या कार्याची पानभर सुद्धा दखल घेतली गेली नाही.

पत्रकारांचं मौन : 
ब्रिटिश गेल्यानंतरही काँग्रेस शासनाने अनेक धोरणांत त्यांचीच भ्रष्ट नक्कल चालू ठेवली. परिणामी हिंदुहितासाठी धडपडणं प्राप्त झालं. मुंबईहून निघणार्‍या साप्ताहिक हिंदू (मराठी) ने 1950 ते 1968 याकाळात ही कामगिरी केली. पण दुर्दैवाने स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणानंतर दोनच वर्षात हे पत्र बंद पडलं. अशा परिस्थितीत विक्रमरावंानी प्रज्वलंत सुरू केलं. 2005 पर्यंत प्रज्वलंत सातत्याने प्रकाशित होत राहिला. त्याचं संपादन स्वत: विक्रमराव करीत असत.

मिताक्षरी, परंतु घणाघाती अग्रलेख हे प्रज्वलंतचं वैशिष्ट्य. त्यांचं भाषाविषयक ज्ञान आणि शब्दांचं अचूक भानही वाखाणण्यासारखं होतं. इतर अनेक व्यापांतून वेळ काढूनही विक्रमरावांनी प्रज्वलंतचा डोलारा व्यवस्थित सांभाळला. या अर्थाने विक्रमराव संपादक - पत्रकारही होते. पण तरीदेखील कुठल्याही विामरावांच्या निधनाची दखल घेतली नाही, याचे वाईट वाटले.
वर्तमानपत्रात बातमी छापताना मालकाची पॉलिसी जपावी लागते, हे मान्य. परंतु स्वत:च्या संघटनेत तरी त्यांना मान द्यायला हरकत नव्हती. एरवी कुणीही लहान-मोठा लेखक-पत्रकार गेला तरी थोर विचारवंत गेल्याच्या अविर्भावात शोकसभेत भाषण वाचणार्‍यांना विक्रङ्कराव सावरकरांविषयी बोलायला जड का जावं?

भरवशाच्या म्हशीला टोणगा : 
सावरकर आणि हिंदुत्त्व हे अगदी एकमेकांना जोडलेले विषय. आज शिवसेना आणि भाजप राज्यात आणि देशात हिंदू कार्ड वापरून सत्ता काबीज करू पाहताहेत. पण दुर्दैवाने या पक्षांनी सुद्धा विक्रमरावांची फारशी दखल घेतली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ‘भाजप’चे नेते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आदींनी सावरकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अशी एक ओळ सोमवारच्या सगळ्या वृत्तपत्रांत झापून आली खरी, पण तेवढ्यानं काही होतं नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे खरे हिंदुहृदयसम्राट. ‘गर्व से कहो हम हिंदू है!’ हा हिंदू महासभेचा नारा. बाबरी ढाचा पाडल्ङ्मावरून दंगल झाल्यानंतर हे शिवसेनाप्रमुख स्वङ्मंघोषित हिंदुहृदयसम्राट झाले आणि हिंदूत्त्व ही शिवसेनेची भूमिका झाली. या अर्थाने शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकरांशी आणि हिंदू महासभेच्या विक्रमराव सावरकरांशीही जोडली जायला हवी होती. पण तसे काही झाले नाही. काही मोजके अपवाद वगळता हा हिरा फारसा प्रकाशात आलाच नाही.

विचारांचा यज्ञ पेटवा : 
किमान आता तरी या परिस्थितीत बदल व्हायला हवा. विक्रमरावांना व्यक्ती म्हणून मोठेपणाचा हव्यास नव्हता. पण आज देश तारायचा असेल तर सावरकरांच्या विचारांची गरज आहे, ही त्यांची भूमिका निश्चितच योग्य होती. आज बहुतांश प्रसारमाध्यमे कुणा ना कुणाच्या दावणीला बांधली गेली आहेत. त्यात अनेक तथाकथित सेक्युलरवादी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सावरकर जनतेपर्यंत पोहोचविण्याची अपेक्षाच करता येणार नाही. त्यामुळे जे अजून कुठल्या दावणीला बांधले गेले नाहीत किंवा जे स्वत:ला हिंदूत्त्ववादीच म्हणवतात, त्यांच्याकडून आज देशाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. देश देशातल्या नट-नटांच्या बातम्या देता, त्याचबरोबर देश उभारणारे विचारसुद्धा दिले पाहिजेत. एवढीच माफक अपेक्षा.

Monday, 24 February 2014

ज्येष्ठ हिंदुसंघटक विक्रमराव सावरकर यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक सदस्य व हिंदुमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कृतिशील कार्यकर्ते विक्रमराव सावरकर यांचे रविवार (ता. 23) दुपारी एक वाजता वृद्धापकाळाने वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी स्वामिनी, दोन मुलगे पृथ्वीराज व रणजित आणि स्नुषा असा परिवार आहे. या वृत्तामुळे सावरकरभक्त, देशप्रेमी व हिंदुत्वनिष्ठ नागरिकांमध्ये एकच शोककळा पसरली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे व त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर यांचे सुपुत्र असलेल्या विक्रमराव यांनी जाज्वल्य देशभक्तीचा व्रत स्वीकारत हिंदुमहासभेसाठी कार्य केले. त्यांच्या हिंदु संघटन कार्यामुळे त्यांचा एक विशेष प्रभाव हिंदुमहासभेच्या कार्यावर राहिला आहे. ऱाष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी देशभर अखंड हिंदुस्थान तसेच समान नागरी कायदा, हिंदूंचे रक्षण आदींसाठी कार्य केले तसेच त्यांचा अनुयायीवर्ग देखील संपूर्ण भारतभर निर्माण केला. सिमला कराराला विरोध करण्यासाठी गनिमी काव्याने त्यांनी सिमल्यात इंदिरा गांधी यांच्याकडे निषेध केला.

मुंबई महानगरपालिकेत वंदे मातरम् हे देशभक्ती गीत म्हणावे, यासाठी मोर्चा काढला तसेच विधानसभेत चर्चा घडवून आणली. त्यावेळी विधानसभेने हिंदुमहासभेच्या कार्यकर्त्यांना शिक्षादेखील सुनावली होती. मात्र आंदोलन यशस्वी झाले. भिवंडी येथे शिवजयंती मिरवणूक निघावी, मलंग गडावरील बंदी दूर व्हावी यासाठी त्यांनी यशस्वी आंदोलनं केली. हिंदुत्वासाठी राजकीय कृतीशील कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखालीदेखील अटक करण्यात आली होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून ठाणे येथे सैनिक शाळा त्यांनी सुरू केली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ते संस्थापक सदस्य होते. प्रकृती अस्वस्थ असली तरी ते सावरकरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारकाचे अनेक उपक्रम प्रत्यक्षात साकारले तसेच स्मारकाचे कार्य राष्ट्रीय स्तरावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

Thursday, 16 January 2014

'माझा महानगर' …. सुरुवात एका नव्या पर्वाची



'माझा महानगर' …. सुरुवात एका नव्या पर्वाची !!!

सुरुवात नव्या बदलाची...



माझा महानगर कार्यालयाचे उद्धाटन करताना महानगर मिडिया प्रा. लि. चे सी.एम.डी आर एन सिंह आणि माझा महानगरचे सहाय्यक संपादक उन्मेष गुजराथी .