दहा-बारा वर्षांपूर्वी ऑटो रिक्षा चालवणार्या महेश मोतेवार या पुण्यातील रिक्षावाल्याने गोरगरिबांच्या कमाईवर अक्षरशः डल्ला मारला व त्यातून जमा केली 1700 कोटी रुपयांहून अधिक रकमेची काळी माया. मात्र या मोतेवारांची आता शंभरी भरली असून त्यांनाही तुरुंगाची हवा खायला लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने आता मोतेवार व त्यांच्या ‘समृद्धी जीवन’ या कंपनीच्या महाघोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
‘समृध्द जीवन ग्रुप’ने पाँझी स्किम्स सारख्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे केंद्रीय प्रबंधक यांनी सीबीआय आणि राज्य सरकारला कळवले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहन कुडांरिया यांनी पत्राद्वारे खासदार किरीट सोमैया यांना दिली आहे. सोमैया यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यामुळे सीबीआयने ‘समृध्द जीवन ग्रुप’ची चौकशी करावी, असे आदेश राज्य सरकारने सीबीआयला दिले आहेत...
मोतेवार व त्यांच्या चांडाळ चौकडीविरुध्दचा फास आता सेबीपाठोपाठ सीबीआयने आवळला आहे. त्यामुळे मोतेवार यांचा व त्यांच्या समृध्द जीवन या कंपनीचा बाजार उठला आहे. केंद्राने सीबीआयला सखोल चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे लुबाडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उत्तराखंड सरकारनेही मोतेवार व त्यांच्या समृध्द जीवनाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. खासदार किरीट सोमय्या यांनीही यासाठी प्रचंड पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
सेबीने सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे निर्देश समृध्द जीवनला दिले आहेत. हे पैसे परत करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतही दिली आहे. ही मुदत 2 डिसेंबरपर्यंत असून 17 डिसेंबरपर्यंत पैसे परत दिल्याचा अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय कंपनी व त्यांच्या 4 संचालकांना भांडवली बाजारबंदी केली आहे. महेश व वैशाली मोतेवार यांच्यावरही कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. याशिवाय समृध्द जीवन बहुउद्देशीय सहकारी संस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होणार असून त्यांच्या मालकीच्या मी मराठी लाईव्ह व मी मराठी चॅनलला टाळे लागण्याची तीव्र शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मोतेवार यांच्यावर एमएससीएस कायद्याच्या 108 कलमांतर्गत कारवाई होणार आहे. त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे त्वरीत न परत केल्यास त्यांना थेट सुब्रतो रॉय यांच्याप्रमाणे तुरुंगाची हवा खावी लागणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दिली.
याबाबत मोतेवार यांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
‘सहारा’ प्रमाणेच आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची रक्कम गोळा करणार्या माध्यम क्षेत्रातील निगडीत महेश मोतेवार यांच्या समृद्ध जीवन समूहावरील कारवाईचे पाश भांडवली बाजार नियामक सेबीने आवळले आहेत. समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड नावाच्या या समूहातील अन्य एका कंपनीला गुंतवणूकदारांची रक्कम तीन महिन्यात परत करण्याचे आदेश देतानाच कंपनीच्या संचालकांना व्यवहार करण्यास प्रतिबंध केला आहे. समूहाशी संबंधित विविध कंपन्यांमध्ये 500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतवणूकदारांकडून गोळा केल्याचा संशय आहे. मोतेवार यांच्यासह चार संचालकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
सेबीचे पूर्णवेळ सदस्य प्रशांत सरन यांनी याबाबतचे आदेश 10 सप्टेंबरला दिले. कंपनीला सध्याच्या योजना गुंडाळण्यासह यापूर्वी अशा योजनांद्वारे मिळविलेली रक्कमही गुंतवणूकदारांना त्यांच्या परताव्यासह आदेश काढल्यापासून तीन महिन्याच्या आत देण्याचे बंधन घातले आहे. गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यासाठी कंपनीची मालमत्ता विकण्याचा पर्यायही या आदेशाद्वारे कंपनीपुढे आता राहणार नाही. कंपनीच्या सर्व मालमत्तांची तसेच संबंधित बँक खाते, डिमॅट खाते, समभाग, रोखे याबाबतची सर्व माहिती सादर करण्यास सांगितले आहे. पुणे येथे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेडच्या महेश किसन मोतेवार, वैशाली महेश मोतेवार, घनश्याम जशभाई पटेल व राजेंद्र पांडुरंग भंडारे या चार संचालकांना गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारण्यासह कोणत्याही प्रकारच्या ठेव संकलन योजना राबविण्यास या आदेशाद्वारे मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजपाचे खासदार किरिट सोमय्या यांनी, गुंतवणूकदारांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यासाठी उपयोगात आणलेली रक्कम ही समूहाने तिच्या विविध वृत्तवाहिन्यांमध्ये वळती केली असल्याचा आरोप केला आहे.
समृद्ध जीवन फूड्स या कंपनीच्या माध्यमातून महेश मोतेवार यांनी बीड जिल्ह्यातील जवळपास 17 ते 20 हजार लोकांना 20 ते 22 कोटी रुपयांना लुबाडण्याचे काम केले आहे. जर गुंतवणूकदारांना या कंपनीकड़ून त्यांचा पैसा मिळाला नाही तर संभाजी सेना रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. - सुधाकर माने, संभाजी सेना, अध्यक्ष
गोरगरिबांच्या घामाच्या पैशातून मोतेवार यांनी 1700 कोटी रुपयांहून अधिक रकमेची काळी माया जमा केली आहे, मात्र या सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश ‘सीबीआय’ला दिले आहे. सरकारचे हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद व जनतेला दिलासा देणारे आहे. आरोपी मोतेवार यांनी गुंतवणूकदारांचे पैसे त्वरीत न दिल्यास त्यांनाही सुब्रतो रॉय प्रमाणे तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
-केतन तिरोडकर, ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते
चिटफंड घोटाळ्यातील समृद्ध जीवन आणि साईप्रसाद या कंपन्यांनी सर्वांत जास्त गुंतवणुकदारांची फसवणूक केली आहे. या कंपन्यांवर बंदी आणल्यानंतरही त्यांनी आपले सर्व पैसे दुसर्या कंपन्यांत वळविण्याचे षडयंत्र रचले होते. मात्र या कंपनीची आता सीबीआय मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. यामुळे हजारो गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे. - कैलास रांगणेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
- महेश मोतेवारची शंभरी भरली
- केंद्र सरकारचे सीबीआय चौकशीचे आदेश
- आता सेबीपाठोपाठ सीबीआयचा भुंगा
- आता मोतेवारची अटक दूर नाही
- लाखो गुंतवणूकदारांना मिळणार दिलासा
- महेश मोतेवारला बेड्या ठोकणार?
- उत्तराखंड सरकारनेही केली होती सीबीआय चौकशीची मागणी
- समृध्द जीवनची सर्व बँक खाती गोठवली
- 2 डिसेंबर पर्यंत सर्व गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याची मुदत
- कंपनी व 4 संचालकांना भांडवली बाजारबंदी
- महेश मोतेवार, वैशाली मोतेवारवर कारवाई होणार आहे.
समृध्द जीवनचा चिटींग घोटाळा
- पशू खरेदीच्या नावाखाली कोट्यवधी केले गिळंकृत
- दामदुप्पटीच्या आमिषानं घातला कोट्यवधींचा गंडा
- समृध्द जीवननं उद्धवस्त केले संसार
- गोरगरिबांच्या कमाईवर मारला डल्ला!
- हा चिटफंड नव्हे, हा तर चिटींग फंड
- गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी केले लंपास

No comments:
Post a Comment