Pages

Thursday, 22 October 2015

कुठे नेऊन ठेवलीय् शिवसेना तुमची?

पन्नाशीची उमर गाठली
अभिवादन मज करू नका!
मीच विनविते हात जोडुनी,
वाट वाकडी धरू नका!!

रेशनकार्डाच्या मागील पानावर कवी कुसुमाग्रज यांची ही कविता तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल. आज शिवसेनेची पन्नाशी सुरू होत आहे. अशावेळी ही कविता किती समर्पक आणि अर्थबोध होण्याजोगी आहे ना! कदाचित प्रत्येक शिवसैनिकांना शिवसेनाच या कवितेतून चांगलीच चपराक हाणत आहे, असेही म्हणता येईल. पन्नास वर्षांपूर्वीच्या शिवसेनेची आजच्या लब्धप्रतिष्ठीत शिवसैनिकांनी आणि त्यांच्या तथाकथित नेत्यांनी काय वाट लावली आहे, ते समस्त महाराष्ट्र बघत आहे.

शिवसेनाप्रमुख हाच एकमेव परवलीचा शब्द होता. बाळासाहेब ठाकरे यांचा प्रत्येक शब्द तळमळीचा, कळकळीचा होता. त्यांच्या प्रत्येक शब्दात, कृतीत, कूंचल्याच्या फटकार्‍यात ताकद होती, आदेश होता. तो अंगार, ती ज्वाला, ती मशाल, ती धगधगती - धमन्या धमन्या चेतवणारी आग तीन वर्षांपूर्वी शमली. अनंतात विलीन झाली. मात्र, बाळासाहेबांच्याच काळात सुरू झालेली पक्षांतर्गत हाणामारी तर आजच्या काळात पराकोटीला पोहोचली आहे. आजचा शिवसैनिक आणि नेता उद्या कुठल्या पक्षात जाईल, यावर कोणाचेच नियंत्रण नाही. जो तो, या 80 टक्के समाजकारणातून बाहेर पडून 100 टक्के राजकारण आणि तितकेच, किंबहुना त्याहून जास्त टक्क्यांत कॉर्पोरेट लाईफस्टाईलनं जगण्याचा आटापिटा करतोय.

गेल्या पन्नास वर्षात ही मराठी माणसाची, मराठी माणसाच्या हितासाठी, हक्कासाठी उभारलेली शिवसेना नामक संघटना कालांतराने संस्था झाली, कालांतराने पक्ष झाली, कालांतराने कॉर्पोरेट कंपनी झाली. आजची शिवसेना ही समाजकारणासाठी नव्हे तर सत्तेसाठी हपापलेल्या लोकांची कंपनीझाली आहे. या वाक्यावर शिवसैनिक चवताळतील, याची आम्हाला जाणीव आहे. पण त्यात तथ्यही आहेच ना! तेवढं लक्षात घ्यावं. तसा शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांनी चेतवलेला अंगार आता शमला आहेच. मराठी माणसाचा अधिकार, हिंदुत्ववादी विचार, सामाजिक सुधारणा वगैरे मुद्दे विसरले गेले आहेत, असे वाटते.

सुधींद्र कुलकर्णींच्या चेहर्‍यावर काळी शाई फेकून आणि शशांक मनोहर यांना घेराव घालून, राज्याच्या प्रमुख सत्ताधीशांना म्हणजे भाजपाला टार्गेट करून काहीही साध्य होणार नाही, हे सारे जाणतात. पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री कसुरी यांच्या कार्यक्रमाला विरोध हे एकवेळ समजून घेतले जाईल, पण गझलगायक गुलाम अली यांच्या कार्यकमाला विरोध का? त्याचे प्रामाणिक उत्तर ना शिवसैनिकांकडे आहे, ना शिवसेनेच्या नेतृत्वाकडे आहे. बाळासाहेबांच्या उभारीच्या आणि पडझडीच्या काळात त्यांना सोबत करणारे नवलकर, नलावडे, जोशी, साळवी, महाडिक, भुजबळ, दिघे, प्रधान, नाईक, राणे यांची आत्ताच्या शिवसेनेला आठवण नाही. शिवसेनेशी स्वत:पेक्षाही जास्त बांधिल असणारे आणि बाळासाहेबांच्या एका शब्दावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे मनोहर जोशी आज वाळीत टाकले गेले आहेत. 

भुजबळ, नाईक, राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली त्याची कारणमिमांसा केली जात नाही. त्यांच्यासारखे नेते शिवसेनेत हवे होते. आज प्रत्येकाने सवतासुभा उभारला आहे. तसा पक्षांतर्गत गटातटाचा सामनासुरूच आहे. नेतृत्वापेक्षा मिलिंद नार्वेकरांच्या धोरणांवर विसंबून राहावे लागते. मातोश्रीपेक्षा सामनातील रोखठोकीवर चर्चा होते. शिवतीर्थावर, म्हणजे शिवाजी पार्कवर हो... तिथं बाळासाहेबांचाच आवाज असायचा. दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांना पर्वणी असायची. विचारांचे मौलिक सोने मिळायचे. सिंहाची गर्जना असायची बाळासाहेबांचे भाषण म्हणजे. आज त्याच शिवाजी पार्कवर डेसिबलच्या मर्यादेत भाषणं करायला परवानगी घ्यावी लागते. बरं, ही परवानगी कोणाची? तर, त्यांच्याच सत्तेतील महापालिकेची, त्यांच्या अर्ध्या सत्तेतील राज्य सरकारची. आयाळ काढून घेतलेल्या सिंहासारखी अवस्था झाली आहे शिवसेनेची. पन्नास वर्षांत ही दुर्दशा ओढावली आहे, याहून दुसरे दु:ख कोणते?

केंद्रातील मोदी सरकारने शिवसेनेच्या खासदारांच्या तोंडाला पानं पुसली, तशीच गत राज्यातील फडणविस सरकारने अर्धे सत्ताधीश असणार्‍या शिवसेनेच्या आमदारांना ताब्यात ठेवून केली आहे. रामदास कदम तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटतात, पण त्याची दखल घेतली जात नाही. इतर मंत्री तर बॅनरबाजी आणि फुकटची तोंडची वाफ दडवण्यात दंग आहेत. केव्हातरी मंत्री, आमदार आणि शिवसेना नेते राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याची पोकळ धमकी देतात. राज्याच्या मंत्रिमंडळालाही एक वर्ष पूर्ण होत आहे. अशावेळी एकतर स्वाभिमानाने बाहेर पडा किंवा सत्तेत राहून लोकाभिमुख काम करून दाखवा, असे आमचे महाराष्ट्रवासी मराठमोळ्या लोकांचे म्हणणे आहे.

केंद्रात काय किंवा राज्यात काय, भाजप सरकार शिवसेनेला कवडीमोल समजत आहे. केंद्रात तर बहुमत आहेच, राज्यात शिवसेनेने पाठिंबा काढला तर राष्ट्रवादीनं बिनशर्त पाठिंबा घायचा वादा आधीच केलेला आहे. त्यांना तुमची ताकद दाखवून घायची असेल तर बाळासाहेबांनी उभारलेल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांचा अंगिकार केला पाहिजे. भाजपा आता कोणालाही मॅनेजकरू शकते, हे वास्तव सत्य आहे. राजकीय व्यासपीठातूनच राज्याचे प्रश्‍न सुटतात असे नाही. समाजकारणही महत्त्वाचे आहे. ज्यावेळी सत्ता नव्हती, तेव्हा तुम्ही ते सिद्ध करून दाखवले होतेच ना. ती आक्रमकता, ते बिनधास्तपण, ती बेडर वृत्ती गेली कुठे? आजची शिवसेना ही बिल्डर लॉबीनं आणि धनदांडग्यांनी वेठीस तर धरली नाही ना? महापालिकेच्या टेंडर घोटाळ्यात कितीतरी अधिकारी, ठेकेदार, कर्मचारी अडकले. त्यांना पाठीशी कोणी घातले? वायफळ वाचाळपणा करणार्‍या महापौरांची यत्ता कोणती? त्यांना आवर घालण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख काहीच हालचाली का करत नाहीत? मुत्सद्दी मुख्यमंत्र्यांनी काबूत ठेवलेले शिवसेनेचे मंत्री आतल्या आत का कुढत आहेत? जाहीरपणे विरोध करण्याची हिंमत का दाखवत नाहीत? मंत्रिमंडळाची बैठक होते तेव्हा हे शिवसेनेचे मंत्री मूळ गिळून गप्प का बसतात? महापालिका शाळांमधील विघार्थ्यांची शैक्षणिक प्रगती करण्यासाठी शिक्षण पद्धती सुधारण्यापेक्षा, शाळा सक्षम करण्यापेक्षा, शिक्षकांना पगार व सुविधा देण्यापेक्षा आजची शिवसेना टेंडरमध्ये आणि टॅब वितरणात व ओपन जीम उभारणीत धन्यता मानते, तेव्हा सर्वसामान्य नागरिक म्हणून कोणालीही संताप येणारच! शिवाय, ज्यांच्यासाठी, ज्यांच्यामुळे शिवसेना उभी राहिली, त्या मराठी लोकांची गार्‍हाणी आता हीच शिवसेना ऐकणार आहे की नाही, याचाही जाब त्यांना घावा लागेल. बाळासाहेबांनी उभारलेली ज्वलंत विचारांची शिवसेना कुठे नेऊन ठेवलीय् तुम्ही लोकांनी!

पन्नास वर्षांचा हा लेखाजोखा साधा नव्हे. पन्नासाव्या वर्षात एका व्यक्तीचे अर्धेअधिक आयुष्य संपते, उमेद संपते... पण, संघटना म्हणून आणि पक्ष म्हणून पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानंतरही रांगत्या मुलासारखा अल्लडपणा संपत नसेल, तर तुमच्या अस्तित्वालाही अर्थ नाही, असा अर्थ काढला जाऊ शकतो!

उन्मेष गुजराथी

No comments:

Post a Comment