आमुचेही कांहीं असों द्या उपकार। एकल्याने थोर कैंचे तुम्ही॥
न घ्यावी जी कांहीं बहु साल सेवा। गौरव तो देवा यत्न कीजे॥
तुका म्हणे नाहीं आमुचा मिराशी। असावेंचि ऐसीं दुर्बळेंचि॥
संतश्रेष्ठ तुकोबांनी कित्येक वर्षांपूर्वीच लिहून ठेवलंय एक वास्तव, जे आजच्या घडीला, आजच्या काळाला आणि आजच्या गरमागरम माहोलमध्ये कितीतरी समर्पक आहे. विषय तसा ‘बाबरी ते दादरी’ असा असला तरी ‘व्हाया साहित्य अकादमी पुरस्कार परत’ मालिकेला अनुसरून आहे. कोणाची कड घ्यावी आणि कोणावर टीका करावी, असा संभ्रम जेव्हा मनात उत्पन्न होतो तेव्हा कळतं की आपणच निलाजरे आहोत. आपली भूमिकाच ठाम नाही. आपण तर केवळ शब्दांचे धनी आहोत. आपण कोते आहोत, आपण पळपुटे आहोत. आपणच आपली भलामण करत आहोत. पुरस्कार दिल्याने पुरस्कार देणाऱ्यांचे आणि घेणाऱ्यांचेही नाव-कौतुक होते. पण पुरस्कार दिले कोणी, कधी आणि कोणत्या परिस्थितीत? तेव्हाचे राज्यकर्ते होते कोण? आत्ताचे कोण आहेत? त्यांच्या पक्षिय राजकारणात आपला आत्मसन्मान किती ढासळत चाललाय? यातले ‘आपण’ म्हणजे कोण ते ‘आपण’च ठरवायचंय.
जेव्हा पुरस्कार मिळाले होते, तेव्हा सामाजिक समस्या, अन्याय-अत्याचार नव्हते का? स्वतःला अति-अति पुरोगामी समजणाऱ्यांनी कधी त्या काळातील या समस्यांकडे गांभिर्याने पाहिले होते का? आत्ताच्या काही दिवसांत झालेल्या घटनांना फक्त सरकारच दोषी आहे असे मानावे का? तुमची आमची, समाजाची, परंपरांची, मागासलेपणाची जबाबदारी नाही का? ही काही सध्याच्या सत्तारूढ सरकारची बाजू मांडण्यासाठीची करामत नाही. आहे ती वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. केवळ पुरस्कार परत करून आणि प्रत्येक वेळी जात, धर्म, सनातन प्रवृत्ती यांच्यावर टीकेची झोड उडवून गप्प राहण्याचा शहाणपणा, निषेधासाठी पत्रके काढण्याची टूम यावरते निलाजरेपण दुसरे नाही. प्रत्यक्ष जा, लोकांना काय हवे आहे, काय चालले आहे ते थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे, याचा एकाकडेही आराखडा तयार नाही. फक्त शाब्दिक निषेध आणि वायफळ टीका यातून काहीच साध्य होणार नाही. सरकारला नमते घ्यायला भाग पाडण्यासाठी आपणही या यंत्रणेचा एक भाग झालं पाहिजे.
पु. ल. देशपांडे, विंदा करंदीकर यांच्यासारखे थोर साहित्यिक काही उगाच थोर झालेले नाहीत. त्यांनी आपल्या पुरस्कारांची सर्व रक्कम प्रत्येक वेळी दान केली आहे. ती देखील बिनबोभाट. फारच कमी लोक आहेत की ज्यांनी पुल व विंदांचा वसा पुढे नेला आहे. केवळ काळ्या फिती लावून आणि तोंडावर काळे फडके गुंडाळून, मेणबत्त्या पेटवून निषेध व्यक्त करायचा, आझाद मैदानात आंदोलन करायचे, प्रेस नोट छापायला द्याच्या किंवा आजच्या डिजिटल युगात व्हॉटस् अॅपवरील आपल्या ग्रुपला, कम्युनिटीला आपले मत शेअर करायचे, कधी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या पुरस्कार परत कर्तृत्वाचे गोडवे गायचे, किती लाईक किंवा किती शेअर मिळालेत याची गणना कन स्वतःचं समाधान करून घ्यायचं, या परती दुसरी अर्थहीनता नाही.
गुलाम अलींचा कार्यक्रम मुंबईत झाला नाही, कसुरींचं पुस्तक काळ्या शाईनं तोंड माखलेल्या कुलकर्णींनी पुन्हा प्रकाशित केलं, दादरीचं राजकारण तर देशभर चाललंच आहे, सेना-भाजपाची आपापसातील कुरघोडीनं तर शिखर गाठलं आहे. एकमेकांवर दोषारोप कन समाज आणि राजकारण सतत पेटवत ठेवण्यात ही मंडळी वाकबगार आहेत. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर सर्व थरात जन्माला आलेली चीड कायम ठेवण्यासाठी तसे प्रयत्नही करायला हवे होते. पण सनातनच्या लोकांना पकडले आणि ही चीड चक्क धार्मिक पातळीवर नेली गेली. गोमांसबंदीचा विषयनको एवढा ताणला गेला. गो हत्या हा काय विषय आहे राजकारणाचा आणि समाजकारणाचा? तो कोणी मोठा केला? कशासाठी? लोकांचे लक्ष डायव्हर्ट करायचे तर असे विषय लागतातच. लोकही मग आपले मूलभूत प्रश्न विसरून अशा बिनमोलाच्या विषयांवर मोठ्या आस्थेने चर्चा करत सुटतात.
सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. आज कुठला रंग, कुठल्या रंगाची साडी, ड्रेस परिधान करायचे, फोटो काढून सोशल मीडियावर टाकायचे यावर खमंग चर्चा केली जात आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या प्राथमिकतेला रितसर वगळले जात आहे. महागाईनं टोक गाठलं आहे. हातावर पोट असणाऱ्यांनी जगायचं कसं, ते कोणी सांगत नाही. सरकारतर्फे पंतप्रधान दादरी, गोमांस आणि गुलाम अली वगैरे प्रकरणात स्वतःला क्लीन चीट देऊन मोकळे होतात. एकीकडे पंतप्रधान मौन धरतात म्हणून टीका होते, दुसरीकडे पंतप्रधान बोलले तरी टीका होते. मोदी तरी काय करतील? त्यांना परदेश दौऱ्यांमधून फुरसत मिळते तेव्हा ते उद्घाटनं, परिषदा आणि बैठका घेण्यात दंग होतात. आपला काय संबंध नाही बुवा, असं म्हणून हात झटकून मोकळे होतात. मग कॉंग्रेसी लोकांची टिवटिव सुरू होते. दिल्लीत असो की मुंबईत, सगळीकडे तेच.
लोकांना मग राजकारण, सिनेमा, क्रिकेट, गुन्हेगारी या चार महत्त्वाच्या विषयातही स्वारस्य असते. लागून सुट्टी आली की आऊटिंगचे प्लॅन आखले जातात. कोणी कोणता पुरस्कार व का परत केला? कशासाठी हे सारं चाललंय, याची काहीऽऽही जाण नसते, गरज भासत नसते. सगळे आपल्या स्वतःच्या मन की बातमध्ये दंग असतात. अशावेळी मग आपण स्वतःला पुरोगामी समजायचे की मागासलेले? हे ठरवावं लागेल. हे प्रश्न जिवघेणे... हरती जिथे शहाणे असं कुठल्याशा कविनं म्हटलं आहे, त्यात तथ्य आहे, असं नाही वाटत तुम्हाला?
- उन्मेष गुजराथी
- उन्मेष गुजराथी

No comments:
Post a Comment