हिंदुस्थानात जातीय दंगलींमध्ये वाढ झाल्याचा कांगावा करीत प्रसिद्धीचा कंडू शमवू पाहणार्या तथाकथित साहित्यिकांमध्ये वाढ होत आहे. काही जणांनी कॉँ. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कलबुर्गी यांच्या हत्येचे कारण पुढे करून सरकारवर टीकाही केली आहे, तर काहींनी पुरस्कारही परत केले आहेत.
खरं तर या मतलबी साहित्यिकांचे पुरस्कार परत करणे, हा तर मला डबल पब्लिसिटी मिळवण्याचा प्रकार वाटतो. यामुळे सरकारवर टीका करण्याचे धाडस दाखवल्याचे कौतुक तर होतेच, शिवाय प्रचंड पब्लिसिटीही मिळते. याशिवाय स्वतःला पुरोगामी म्हणून मिरवण्याची हौसही होते. यापैकी बहुतांशी पुरस्कार तथाकथित साहित्यिकांना तत्त्कालीन सरकारची लाचारी केल्यामुळेच मिळालेले आहेत. आता या साहित्यिकांमध्ये हे पुरस्कार परत करण्याची जणू चढाओढच लागलेली आहे. मात्र हेच तथाकथित साहित्यिक पुरस्कार घेताना मिळालेली रक्कम, सरकारला परत करण्याचे सौजन्य दाखवत नाहीत. या मोबदल्यात स्वस्त पब्लिसिटीची हौस ते भागवून घेतात.
१९९० साली जम्मू - काश्मीरमधील सुमारे साडेचार लाखांहून अधिक हिंदूना कायमस्वरुपी बेघर करण्यात आले. तेथील हजारो कलावंत, साहित्यिकांच्या हत्या करण्यात आल्या. आजही या हत्या चालूच आहेत, यावेळी कुठे गेले होते हे तथाकथित ढोंगी साहित्यिक?
२४ जून २०१२ साली सॅटॅनिक व्हर्सेस या वादग्रस्त पुस्तकाचे भारतीय लेखक सलमान रश्दी यांनी जयपूरमधील साहित्य संमेलनात सहभागी होण्याला मुस्लीम मूलतत्ववादी गटांनी विरोध केला. सलमान रश्दी भारतात आले तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे त्यांचा फक्त जयपूरच नाही संपूर्ण भारत दौरा रद्द झाला. आयोजकांनी जर सलमान रश्दी यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दाखवलं तर संमेलनातात हिंसाचार घडवून आणण्याची धमकीही दिली. त्यानंतर अगदी नाईलाजाने आयोजकांना रश्दी याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही रद्द करावं लागलं, मात्र त्यावेळी त्या धर्मांध मुस्लिमांवर कोणती कारवाई केली गेली? त्यावेळी कुठे गेले होते हे पुरस्कार परत करणारे तथाकथित पुरोगामी साहित्यिक? खरं तर या मतलबी लोकांचे पुरस्कार परत करणे हा राखी सावंत करते तसा पब्लिसिटीच्या स्टंटचाच एक प्रकार आहे.
हे ढोंगी पुरोगामी क्रॉमेड गोविंद पानसरेंचा उदोउदो करतात, त्या पानसरेंच्या लालभाईछाप विचारांशी आमचे विचार सहमत असूच शकत नाहीत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे शीर्षक आहे ‘शिवाजी कोण होता?’ छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी नावाने संबोधण्याचे महापातक महाराष्ट्रात दुसर्या कोणी केले असते, तर या ढोंगी पुरोगाम्यांच्या पोटात केवढा शूळ उठला असता. असो.
माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी, गोहत्याबंदी प्रकरणात हत्या केलेले भिवंडीतील ललित जैन यांचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत. इतकेच काय पण माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हत्या प्रकरणात हजारो शिखांच्या कत्तली झाल्या, तेव्हा कुठे गेले होते हे मेणबत्तीवाले .
कर्नाटकमधील ज्येष्ठ विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वप्रथम माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नात नयनतारा सेहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला. खरं तर डॉ. दाभोलकरांची हत्या ही काँग्रेसच्याच कार्यकाळात झाली. मात्र त्यावेळी त्यांनी पुरस्कार परत करणे तर सोडाच, पण साधा निषेधाचा शब्दही काढला नाही. त्यावेळी त्यांनी पुरस्कार परत करणे तर सोडाच, पण साधा निषेधाचा शब्दही काढला नाही, हा दुटप्पीपणा नव्हे काय?
आझाद मैदान येथील रझा अकादमीच्या मोर्चानंतर उसळलेल्या दंगलीत 46 पोलिस जखमी झाले , तर पाच महिला पोलिसांचा विनयभंग झाला. तेव्हा हे पुरोगामी कुठे शेपूट घालून बसले होते? या धर्मांधांच्या विरोधात केस दाखल करण्याची व प्रत्त्युत्तर देण्याची हिंमत दाखवली, ती फक्त 'सनातन संस्थे'नेच.
मकबूल फिदा हुसेनसारखे नतद्रष्ट भारतमातेची नग्न चित्रं काढायचे, तेव्हा हे पुरोगामी साहित्यिक तत्त्कालीन मुस्लिमधार्जिण्या सरकारकडून पुरस्कार घेण्यात मग्न होते. प्रेषिताचा अपमान केला, या आरोपातून केरळमधील एका प्राध्यापकाचे हात कापून टाकले. तेव्हा का नाही या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले ? देशात अघोषित आणीबाणी असल्याचे आरोप करणार्या या साहित्यिकांनी इंदिरा गांधीच्या काळात प्रत्यक्ष आणीबाणी असताना का नाही पुरस्कार परत केले ? रामदेवबाबांचे आंदोलन उधळून लावताना अमानुष मारहाण करून एका स्त्रीची हत्या झाली, तेव्हा का नाही या लोकांनी पुरस्कार परत केले ? राज्यात पाण्याची टंचाई असताना , एक शेतकरी उपोषणाला बसला असतांना, धरणात लघुशंका करण्याची भाषा माजी जलसंपदामंत्री अजीत पवार करतात, तेव्हा का नाही त्यांनी पुरस्कार परत केला ?
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची हत्या वैचारिकतेतून झालेली होती, आणि या हत्येचा कट अत्यंत विचारपूर्वक आणि कोणताही धागादोरा मागे न ठेवणारा, असा होता. अशी हत्या सीआयए, केजीबी, मोसाद या गुप्तहेर संघटनाच करू शकतात. कम्युनिझमच्या फायद्यासाठी ही हत्या करण्यात आली, असा आरोपही त्यावेळी झाले, तेव्हा कुठे गेले होते हे ढोंगी?
एक जमाना होता जरा कुठे खट्टू झालं, तर संघ स्वयंसेवकांवर खोटया केसेस दाखल केल्या जायच्या. आता 'नमो 'पर्वामुळे संघाचे स्थान प्रचंड बळकट झाले आहे. यामुळे कट्टर संघविरोधक बारामतीकर काकानाही चक्क हातात 'झाडू' घेण्याची पाळी आली. एके काळी या काकांवर बोलताना लोक दहा वेळा विचार करीत, हल्ली 'बच्चे कंपनी'ही या 'जाणता राजा'ला ठोकून काढते. तात्पर्य काय तर संघाच्या सत्तेतील छुप्या दबावामुळे आता संघविरोधात कोणी 'ब्र' देखील काढण्याची हिंमत करीत नाही. अशावेळी राजकीय आश्रय नाकारणाऱ्या, धर्मान्धांविरोधात आवाज उठविणाऱ्या मात्र सौम्य असणाऱ्या सनातन संस्थेच्या साधकांना हकनाक गोवण्यात येते. यानिमित्ताने तथाकथित पुरोगाम्यांना वारेमाप पब्लिसिटीची हौसही भागवता येते.
हिंसा, खून करून कोणताही विचार संपत नसतो. 'केला जरी पोत बळेची खाली, ज्वाळा ती वरती उफाळे..’ हे तत्त्व आहे. मात्र, या प्रकारच्या घटनांकडे समान नजरेने पहायला ह्वे. जितक्या तीव्रतेने पानसरे, दाभोळकर यांच्या हत्येचा आपण निषेध करतो, तितक्याच तीव्रतेने नक्षलवादी गळे चिरून निरपराध लोकांना मारतात त्याचाही निषेध केलाच पाहिजे. केरळसारख्या राज्यात साम्यवादी हे संघाच्या शेकडो स्वयंसेवकांचे खून करतात, त्याचाही निषेधच झाला पाहिजे. अशा घटनांकडे पाहताना दुहेरी मापदंड उपयोगाचे नाहीत, नव्हे या घटनांकडे दुटप्पीपणाने बघणे हा राष्ट्राद्रोहीपणा आहे.
- उन्मेष गुजराथी
- उन्मेष गुजराथी
No comments:
Post a Comment