हिंदूंसह मुसलमानही संतापले; जातीय दंगल उसळण्याची शक्यता
एमआयटीच्या संस्थाचालकांची स्टंटबाजी
'येनकेन प्रकारेण' प्रसिध्दीचा कंडू शमवू पाहणार्या पुण्यातील एका संस्थाचालकाने चक्क नाशिकच्या पवित्र रामकुंडात मक्का, मदिना यासह व्हॅटिकन सिटीतले पाणी मिसळण्याचा सोहळा शुक्रवारी सकाळी 9 वाजता आयोजित केला आहे. यामुळे हिंदूच काय पण मुसलमान व ख्रिश्चन धर्मियांमधील भाविकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. मात्र दुदैवाची बाब म्हणजे सर्वच धार्मिक व राजकीय संघटना याबाबत अद्यापही मूग गिळून गप्प आहेत.
पुण्यातील एमआयटीचे संस्थाचालक प्रा. विश्वनाथ कराड यांच्या 'सुपिक' डोक्यातून ही स्टंटबाजीची कल्पना आली आहे. नाशिकचे पवित्र रामकुंड जगभरात प्रसिध्द आहे. कुंभमेळ्यात तर येथे लाखो भाविक स्नान करून पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करतात. या पवित्र नदीत केदारनाथ, बद्रिनाथ, मानसरोवर, अमरनाथ, अयोध्या, काशी, पुष्कर, बोधगया यांसह मुसलमानांच्या दृष्टीने 'पाक' म्हणजे पवित्र असणार्या मक्का, मदिना तर ख्रिश्चनांच्या 'होली' म्हणजे पवित्र असणार्या नद्यांचे पाणी एकत्र करून अर्पण करण्यात येणार आहे.
हिंदूंच्या दृष्टीने मक्का, मदिना व व्हॅटिकन सिटी येथील नद्यांच्या पाण्याने स्नान करणे हे निषिध्द व धर्मशास्त्राला छेद देणारे आहे. तर मुसलमानांच्या दृष्टीने मक्का, मदिनेच्या नद्यांतील पाण्याने हिंदूंनी स्नान केले तर त्यांच्या पाकजलाचा ते अपमान करणारे व धर्मशास्त्राला बाधक असे कृत्य आहे. या 'पाक' जलात हिंदूंनी पाय ठेवल्याने ते नापाक होणार आहे. यामुळे हिंदूंसह मुसलमानांच्या भावनांनाही ठेच लागली आहे.
गंगा नदी ही सर्व पावनी आहे. म्लेच्छांच्या स्पर्शाने ती दूषित होते. त्यामुळे सर्वधर्मतीर्थ कुशावर्त येथे मक्का,मदीना येथील नद्यांमधील पाणी टाकल्यास गंगा (म्हणजेच गोदावरी) दूषित होऊ शकते, म्हणून यास आमचा विरोध आहे.सर्व ठिकाणचे तीर्थ विशेषरुपाने एकत्र करुन ते मंदिरात टाकण्याची कोणतीही कृती हिंदु धर्मात सांगितलेली नाही, असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने सर्वधर्मतीर्थ येथील सुप्रसिध्द श्री काळाराम मंदिर, पवित्र रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त येथे टाकले जाण्यापासून रोखावे. सर्वधर्माचे तीर्थ एकत्र करुन ते मंदिरात वा कुशावर्त येथे टाकणे, हे सनातन हिंदू धर्माच्या विरुध्द आहे. ही एक प्रकारची नाटकबाजी आहे. केवळ मंदिरातच टाकले जाते, मात्र एखादी मशीद व चर्च येथे टाकण्यास जाऊ दिले जात नाही. सर्वजण सर्व धर्मांचा आदर करतात; मात्र काही मंडळींकडून आम्ही सर्वधर्मसमभावी आहोत, हे दाखवण्याचा केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे.
- शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती
- श्री महंत नरेंद्रगिरीजी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद
मुसलमान धर्मामध्ये पवित्र पाण्याला 'आल ए झम झम' म्हणतात. ते पवित्र पाणी प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात येते. रामकुंडात हे पाणी टाकणे, म्हणजे त्याचा दुरुपयोग करण्यासारखे आहे. या पाण्याने आंघोळ करणे, हे तर इस्लाम धर्माच्या विरुद्ध आहे. हा मुस्लीम भाविकांचा अपमान आहे. -मुक्तार आदील, सरचिटणीस, उर्दु मिडीया सेंटर
नद्यांचं पाणी विविध ठिकाणांहून आणणे, ही तर भारतातील प्राचीन संस्कृती आहे. भारत हे तर जगातील ज्ञानाचे उगमस्थान आहे. नद्यांचं पाणी आणणं, याला प्राचीन संदर्भ आहे. मात्र मक्का, मदिना, व्हॅटिकनमधून पाणी आणून काय साध्य होणार ? मुसलमान व ख्रिश्चनांच्या विचारधारेशी हिंदूंची विचारधारा एक होणार आहे का? हा संपूर्ण मूर्खपणाचा व पाब्लिसिटी स्टंटचा प्रकार आहे. मात्र हा पायंडा अत्यंत घातक आहे.
-डॉ. उदयकुमार पाध्ये, सामाजिक कार्यकर्ते
देशभरात ज्या ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्या ठिकाणी देशातील पवित्र नद्यांचा संगम झालेला आहे. हिंदू धर्मात या नद्यांच्या संगमस्थळी शाहीस्नान करण्याची प्रथा आहे. प्रयाग अर्थात अलाहाबाद येथे गंगा, यमुना आणि लुप्त पावलेली सरस्वती नदी यांचा संगम होतो. त्या संगमाच्या ठिकाणी शाहीस्नान केले जाते. नाशिक येथे गोदावरी आणि गंगा नदी यांचा संगम होतो. पवित्र नद्यांच्या संगमाला येथे महत्त्व देण्यात आले आहे. अशा वेळी या संगमात मक्केतील पाणी मिसळून 'सर्वधर्मसंगम' ही भलतीच प्रथा रुढ करणे म्हणजे धर्मशास्त्राला छेद देण्यासारखे आहे.
- प्रा.चारुचंद्र उपासनी, सामाजिक कार्यकर्ते
हिंदू धर्म हा सहिष्णूतेची शिकवण देतो. यामुळे आम्ही एकवेळ हा सर्व धर्माला छेद देणारा प्रकार सहन करु, मात्र उद्या याच कथित सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदुस्थानातील नद्यांचे पाणी मक्का, मदिना व व्हाटीकन सिटीमधील लोकांच्या धर्मस्थळांमध्ये अर्पण केले तर ते तेथील भाविकांना आवडेल काय?
No comments:
Post a Comment