Pages

Friday, 18 September 2015

समीर गायकवाड बळीचा बकरा ?

कोल्हापूर येथील कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला समीर गायकवाड हा ‘सनातन’चाच पूर्णवेळ साधक असून तो निष्पाप अन् निर्दोष आहे, याचा वारंवार पुनरुच्चार सनातन संस्थेने विविध प्रसिद्धी माध्यमांतून केला आहे. यापूर्वीही डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या साधकांची चौकशी झाली. त्यांना नाहक बदनाम करण्याचे षडयंत्र करण्यात आले. मात्र यातून अद्याप काहीही निष्पन्न न झाल्यामुळे केवळ सनातन संस्थेमध्येच नव्हे तर संबंध हिंदुत्ववाद्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी 2 कोटी कॉल रेकॉर्ड्सवरून सनातनच्या साधकाचाच क्रमांक शोधून त्याला हेतूपूर्वक अटक केली असल्याचा आरोपही संस्थेने केला आहे.

याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी करीत सरकारच्या 'चोर सोडून संन्याशाला फाशी' या प्रवृत्तीचा सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. आपल्या या आरोपात संस्थेनेपुढे असे म्हटले की,  यापूर्वीही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या अनेक साधकांची चौकशी झाली होती. सनातनला यापूर्वीही अनेकवेळा झोडपण्यात आले आहे; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

समीर गायकवाड यांना संशयावरून अटक करण्यात आली आहे. पोलीसही त्यांना संशयित असल्याचे म्हणत आहेत. लवकरच यामागील सत्य उघडकीस येईल. सनातनही आध्यात्मिक संस्था असल्याने ती प्रत्यक्ष कायदेशीर साहाय्य करू शकत नाही. समीर गायकवाड हे निष्पाप असल्याने त्यांना हिंदु विधीज्ञ परिषद किंवा अन्य हितचिंतक अधिवक्ता यांच्यामार्फत कायदेशीर साहाय्य पुरवण्यात येईल, अशी माहिती अॅड. संजीव पुनाळेकर यांनी दिली.

अटक संशयास्पदच
निष्पाप समीर गायकवाड याला गोवण्यासाठी पोलिसांनी बनाव रचला आहे. पोलिसांनी अशी थेट अटक करणे संशयास्पद आहे. एखाद्याला 24 तास चौकशी किंवा पडताळणी केल्यानंतर त्यांना पुढील 24 तासांत न्यायालयात हजर करायचे असते. त्यासाठी पोलिसांना काही तास बसून रिमांड कागदपत्रे बनवावी लागतात. येथे पहाटे अटक करून लगेच पोलिसांनी न्यायालयात हजर केले. याचाच अर्थ कागदपत्रे आधीच बनवण्यात आली होती. हा संपूर्ण बनाव आहे, हे यातून स्पष्ट होते. अटक झाल्यानंतर त्यांच्या परिवाराला कळवायचे असते. पोलिसांनी अटक केल्यानंतर काही तासांनी आई-वडिलांना कळवले, हे गंभीर आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

समीरसह त्याचे संपूर्ण कुटुंब आमचे साधक - सनातन
समीरच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटुंब आमचे साधक असून, त्याच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सनातनने म्हटले आहे. शिवाय समीरचे निर्दोशित्व सिद्ध करण्यासाठी गायकवाड कुटुंबाला कायदेशीर मदत करणार असल्याचेही संघटनेकडून सांगण्यात आले.

अशी घडली होती घटना
 15 फेब्रुवारीला सकाळी आठच्या सुमारास गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरातील सागरमळा भागातील राहत्या घराजवळ हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा नेहमीप्रमाणे शिवाजी विद्यापीठ परिसरातून मॉर्निंग वॉकवरुन परतत असताना, दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी एकूण तीन गोळया झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी पानसरे यांच्या मानेला लागली. एक गोळी त्यांच्या हाताला चाटून गेली. उमा पानसरे यांनाही एक गोळी लागली होती. मात्र, त्यांचे प्राण वाचले.

समीरला सात दिवसांचा पीसीआर
इतिहास संशोधक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोन कोटी फोन कॉल्स तपासून सांगलीतून समीर गायकवाड याला बुधवारी सकाळी 4 वाजता अटक केली. न्यायालयाने त्याला सात दिवसांचा पीसीआर ठोठावला असून, समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. 
संजय कुमार, पोलिस महानिरीक्षक
 (कोल्हापूर परिक्षेत्र)

कोण आहे हा समीर गायकवाड ?
32 वर्षांचा समीर विष्णू गायकवाड हा सांगलीच्या शंभर फुटी रोडवरील मोतीचौक परिसरात राहत होता. गायकवाड 1998 पासून सनातन संस्थेत पूर्णवेळ काम करतो. मोबाईल रिपेअरिंगचे काम करणारा समीर गायकवाड हा मुंबईत सनातन संस्थेचा ‘धर्मरथ’ चालवायचे काम करत होता. इतकंच नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब सनातन संस्थेशी संबंधित आहे. 
त्याची पत्नी सध्या गोव्यातल्या आश्रमात राहत आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून गायकवाडला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या सांगलीच्या घरी पोलिसांनी छापा मारला आहे. पानसरे यांच्या हत्येत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गायकवाडचा संबंध असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे. या अटकेमुळे या हत्याप्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेत असा विश्वास पोलिसांना आहे. गायकवाडची झाडाझडती सुरू असून यासंबंधी सांगली, मुंबई, नवी मुंबईत तपास करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

उन्मेष गुजराथी

No comments:

Post a Comment