Pages

Tuesday, 22 September 2015

लालबागचा राजाच्या मंडळाविरोधातील तक्रारी मागे घे, नाहीतर गोळ्या घालू!

आरटीआय कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांना धमकी   
(मुंबई) लालबाग येथील ‘लालबागचा राजा’च्या विश्वस्त मंडळाने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे, ज्येष्ठ सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांना त्यांच्या कुटुंबियांसह गोळ्या घालून ठार मारण्याच्या धमक्या आल्याने त्यांनी स्वतःला व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षणाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

लालबागचा राजा विश्वस्त मंडळाचे मानद सचिव व शिवसेनेचे शिवडी येथील विभाग संघटक सुधीर साळवी व विश्वस्त मंडळातील सदस्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अफरातफरीची चौकशी करावी, असे तातडीचे आदेश मुंबई हायकोर्टाने चॅरिटी कमिशनला दिले होते.  इतकेच नव्हे तर या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेशही विधी व न्याय विभागाला दिले होते.

या सर्व आदेशांसाठी व या कथित भ्रष्टाचाराची माहिती आरटीआयमधून खणून काढण्यासाठी वेंगुर्लेकर यांनी मागील चार-पाच वर्षांपासून अथक परिश्रम केले होते. सरकारी दरबारी जोडे झिजवले होते, यामुळेच विश्वस्त मंडळावरील हे बालंट टळावे व अधिक चौकशी होऊ नये, यासाठीच आपल्याला गोळ्या घालण्याच्या धमक्या आल्याचे वेंगुर्लेकरांनी सांगितले. वेंगुर्लेकरांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक संजीव दयाळ व पोलीस आयुक्त जावेद अहमद यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

अब्रुनुकसानीचा दावा
‘लालबागचा राजा’च्या मंडळाने दै. मुंबई मित्र - वृत्त मित्रचे समूह संपादक अभिजीत राणे, कार्यकारी संपादक उन्मेष गुजराथी व आरटीआय कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. हा दावा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असून मंडळातील कथित भ्रष्टाचार बाहेर पडू नये, यासाठी जनतेच्या पैशातूनच हा दावा दाखल केला आहे. यासाठी कागदपत्रे, वकील करण्यासाठी करण्यात आलेला खर्च करताना धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेतली काय, असा सवालही वेंगुर्लेकर यांनी केला आहे. यासंदर्भात साळवी व पवार यांना प्रतिक्रियेसाठी वांरवार फोन केला असता, त्यांनी फोन न उचलणे पसंत केले.

तक्रारी मागे घे, नाहीतर...  
मंडळाच्या विरोधात केलेल्या तक्रारी मागे घे, आरटीआयचा पत्रव्यवहार त्वरीत थांबवा, नाहीतर तुला कुटुंबियासह गोळ्या घालू, अशी धमकी देण्यात आल्याचे वेंगुर्लेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.  मी व माझ्या कुटुंबियांचे बरे-वाईट झाल्यास मंडळाचे मानद सचिव, शिवसेनेचे शिवडी विभागाचे संघटक सुधीर साळवी, अध्यक्ष अशोक पवार यांना जबाबदार धरण्यात यावे, असेही वेंगुर्लेकर यांनी केलेल्या मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment