Pages

Saturday, 19 September 2015

सनातनपेक्षा आधी हिंस्र राजकीय पक्षांवर बंदी घाला !

सनातन उवाच : समीर गायकवाड निर्दोषच; सनातन संस्था त्याच्या पाठिशी ठाम!
राजकीय पाठिंब्याअभावीच सनातनची फरफट

(मुंबई) सनातन संस्था ही अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारी संघटना आहे. ती कोणाचाही राजकीय पाठिंबा घेत नाही, व तशी आम्हाला अपेक्षाही नाही. मात्र केवळ पाठिंबा नाही, म्हणून तथाकथित पुरोगामी हे पोलिसांवर दबाव आणून आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करायला भाग पाडतात, असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते संदीप शिंदे यांनी केला. मात्र त्याचवेळी समीर गायकवाड हा निर्दोष असून, संस्था त्याच्या पाठिशी ठाम उभी आहे, त्याचा पुनरुच्चारही शिंदे यांनी यावेळी केला.

विचारवंतांच्या हत्यांमुळे त्यांचे कुटुंबिय व चाहत्यांनी सरकार आणि पोलिसांवर आणलेला दबाव, हत्येकऱ्यांना केवळ हिंदुत्त्ववादी म्हणून सरकार पाठिशी घालण्याचा आरोप, मिडियाचा पोलिसांवर असणारा दबाव, यासंदर्भात विधानसभेत उठणारे तारांकित प्रश्न, या सर्व प्रकरणांना वैतागून सरकारने केवळ दिखावूपणासाठी समीर गायकवाडला संशयित म्हणून अटक केली, असा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला.

समीरवरील आरोप अद्याप सिद्ध झाले नाहीत. पोलिसांवरील दबावतंत्रामुळे त्यांनी ही धरपकड केली असल्याचे सनातनने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पुरोगाम्यांना सर्व हिंदूंना धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे. पण त्यांच्याआड सनातन संस्था येत आहे. त्यामुळेच ते आमच्यावर बंदीची मागणी करीत आहेत, असे सनातनने यावेळी म्हटले. संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, डॉ उदय धुरी आणि कायदेविषयक सल्लागार संजीव पुनाळेकर यावेळी उपस्थित होते.

पोलिसांवर हात उचलणाऱ्या रझा अकादमीवर बंदी का नाही? 
सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे जितेंद्र आव्हाड, शाम मानव आणि दाभोलकर कुटुंबीय त्यावेळी कुठे होते? असा सवाल देखील सनातन संस्थेने केला आहे. जेव्हा रझा अकादमीच्या लोकांनी पोलिसांवर हात उचलला होता. देशात काहीही झाले तर थेट सनातनकडे बोट दाखवले जात आहे. सनातनने हिंदू जनजागृती केली. देशाभिमानासाठी काम केले. मात्र, पुरोगाम्यांना हे बघवत नसल्याचे सनातनने म्हटले आहे. तसेच देशातील तपास यंत्रणा या स्वत:ला पुरोगामी समजणाऱ्या लोकांच्या हातातील बाहुले झाल्याचा आरोपही यावेळी सनातनने केला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल याला अटक केली. त्यावेळीही सनातनवर आरोप झाले. मात्र, त्यांचे पुढे काय झाले? असा सवाल देखील सनातनने केला. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर म्हणाले, आम्ही या संदर्भात तथाकथित पुरोगाम्यांच्या षडयंत्राला बळी न पडता निष्पक्षपणे तपास होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागण्याही केल्या आहेत.

सनातनपेक्षा आधी हिंस्र राजकीय पक्षांवर बंदी घाला !
पानसरे हत्येप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लीकन पक्ष आदी राजकीय विचारसरणीच्या लोकांनी सनातनवर बंदीची मागणी केली आहे. सनातनच्या एका साधकाला संशयित म्हणून अटक झाली; म्हणून सनातनवर बंदी घालण्याची मागणी होत असेल, तर प्रथम
1. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा सिद्ध झाला आहे; म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी घालावी.
2. शीखविरोधी दंगली घडवून सहस्त्रावधी निरपराध शिखांची कत्तल केल्याबद्दल काँग्रेस पक्षावर बंदी घालावी.
3. केरळमध्ये 250 स्वयंसेवकांची हत्या राजकीय कारणांसाठी केल्याची स्वीकृती देणाऱ्या एम. मणी यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर बंदी घालावी. 
4. अंनिसचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सिद्ध झाले असल्यामुळे त्यांच्यावर बंदी घालावी. 
असा स्वतःचा खुनी इतिहास ज्ञात नसलेल्या राजकीय पक्षांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणे, हे हास्यास्पद आणि लज्जास्पद आहे. म्हणून सनातनपेक्षा आधी हिंस्र राजकीय पक्षांवर बंदी घालावी, अशी 'सनातन'ची मागणी आहे.

सनातन संस्था ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याने, पुरोगाम्यांच्या दबावामुळे पोलीस सहजपणे संस्थेवर सातत्याने कारवाई करत आहेत. आम्हाला राजकीय वरदहस्ताची आवश्यकता नाही, आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, त्यामुळे ‘सत्यमेव जयते’च होईल !
- सनातन प्रवक्ता संदीप शिंदे

सनातनने मुख्यमंत्यां  कडे केलेल्या मागण्या: 
दाभोलकर-पानसरे प्रकरणात पुरोगाम्यांची एकांगी विचारसरणी लक्षात घेता त्यांच्या दबावाला बळी न पडता स्वतंत्रपणे तपास करावा आणि या हत्यांचे, सर्व पैलू तपासण्यात कसलीही कसर राहू नये, असे आदेश द्यावेत.
तपासाच्या दृष्टीने दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांच्या सूचनांवर कार्यवाही व्हावी; मात्र तपासदलाचे अनधिकृत नेतृत्व त्यांच्यावर सोपवण्याची चूक टाळावी. अन्यथा तपास भरकटून निष्पाप व्यक्तींना त्रास सहन करावा लागेल.
सनातन संस्थेला लक्ष्य करून आरोप करणाऱ्या काही व्यक्ती आणि संघटना यांची प्रवृत्ती अत्यंत संशयास्पद वाटते. तसेच सनातन संस्थेने त्यांचे आर्थिक घोटाळे उघड केले असल्यामुळे काही निष्कर्षांपर्यंत तपास यंत्रणा पोहोचू नयेत, या धडपडीतून सनातनला लक्ष्य केले जात आहे का, याचीही सखोल चौकशी व्हावी.
श्याम मानव यांची तपासकामातील लुडबुड थांबवावी आणि ते ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांचा उल्लेख करून स्वतःची शेखी मिरवत आहेत. त्यास आळा घालावा. 

सनातन संस्था ही आध्यात्मिक आणि राष्ट्रभक्त संघटना असून, कोणताही निष्कर्ष समोर आलेला नसतांना पुरोगाम्यांच्या बेछूट आरोपांमुळे संस्थेची नाहक बदनामी होत आहे. संस्थेने अनेक मंदिरांतील घोटाळे बाहेर काढण्यासह, पर्यावरण रक्षण, तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात विविध जनजागृती चळवळी शिस्तबद्धरीत्या राबवून, राष्ट्रीय स्तरावर कार्य उभे केले आहे. त्याला रोखण्याचे षड्यंत्रच या तथाकथित पुरोगाम्यांनी आखलेले दिसते. सनातन संस्था या आरोपांच्या वादळातून निश्चित तरून निघेल आणि समाजात राष्ट्रभक्ती रुजवण्याच्या कामी अधिक जोमाने कार्यरत होईल, याचा आम्हाला विश्वास आहे. या वेळी उपस्थित हिंदू गोवंश रक्षा समिती, राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ, श्री महाराष्ट्र रामलीला मंडळ या हिंदुत्ववादी संघटनांनीही सनातन संस्थेला जाहीर पाठिंबा दिला आणि हिंदुत्ववादी संघटनांवरील मानहानीच्या विरोधात संघटितपणे उभे रहाण्याचा मानस व्यक्त केला. 
अभय वर्तक, सनातन संस्था, प्रवक्ते  

व्यक्तिगत प्रसिध्दीसाठी सनातनवर आरोप केले जात आहेत. समीर हा निर्दोष आहेच पण एका कार्यकर्त्याला अटक झाली म्हणून संपूर्ण संस्थेला फाशी देणे योग्य नाही. तपासयंत्रणांनी पुरोगाम्यांच्या दबावाखाली ही कारवाई केल्याचा आरोप सनातनने केला. दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरणात आम्ही तपास यंत्रणांना सहकार्य केलं आहे. तपास यंत्रणांना आम्ही महत्वाची माहिती दिली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले, असा दावाही सनातनने केला.

उन्मेष गुजराथी

No comments:

Post a Comment