दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी... एका पाठोपाठ एक अशा तीन विचारवंतांच्या हत्या झाल्या. आणि प्रत्येक वेळा संशयाची सुरी ‘सनातन’कडे वळली. अर्थात या प्रकरणांतील खरे आरोपी कोण याची अजून शहनिशा व्हायची आहे. पण त्याआधीच अनेकांनी ‘सनातन’वर बंदी घालायची मागणी लावून धरली आहे. कित्येकांना ‘सनातन’पासून त्यांच्या जीवाला धोका असल्याचा साक्षात्कार होऊ लागलाय.
सनातन म्हणजे ‘इसिस’च्या धर्तीवरील एखादी संस्था असावी, असेच एकंदर चित्र उभे करण्यात आलंय. इसिसमध्ये भरती होण्यासाठी जाणर्या तरुणांपेक्षा सनातनचा साधक समीर गायकवाड माध्यमांत जास्त गाजतोय. खरंच इतकी खतरनाक असेल सनातन संस्था, तर मग आज बंदीची मागणी करणारे स्वत: सत्तेत असताना गप्प का बसले होते? देशहिताच्या एवढ्या महत्त्वाच्या बाबीसाठी एवढा विलंब कशासाठी?
एकीकडे पोलिसांनी समीर गायकवाडचा उल्लेख ‘टफ नट टू क्रॅक’ असा केल्याच्या बातम्या येतात. त्याचा वकील सोबत असल्यामुळे पोलिसांना त्यांच्या खास पद्धतीने तपास करता येत नाही. त्यामुळे कारवाईला उशीर होतोय, असेही छापून येते. अर्थात अशा बातम्या एकंदरीत पोलिस तपासावरच प्रश्न चिन्ह उभे करतात. पोलिस तपास म्हणजे, ‘पोलिसी खाक्या दाखवून गुन्ह्याची कबुली घेणे नव्हे’ यावर अजुनही आमचा विश्वास आहे. असो.
तर सांगायचा मुद्दा असा की, जो तोंडच उघडत नाही. त्याच्या चौकशीतून अनेक गंभीर बाबी पुढे येत आहेत, हे मानायचे कसे? माध्यमांना अशा परस्पर विरोधी बातम्या कोण पुरवतंय? वागळेंच्या जीवाला धोका, हे पोलिसांनी अधिकृतपणे सांगितले आहे का? तसे असेल तर सगळ्याच माध्यमांनी तसं ठामपणे का सांगितले नाही? केवळ काही ठरावीक ठिकाणीच वागळेंनी पोलिस प्रोटेक्शन नाकारल्याची बातमी कशी? मुद्द्लात वागळेंना पोलिस प्रोटेक्शन दिलंच नव्हते तर त्यांनी ते नाकारलं तरी कसं? कोण अशा अफवा पसरवतंय? आणि त्यामागची कारणं काय?
केवळ सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी हे सगळं चालले आहे का? सनातनला बदनाम करुन कोणाचा फायदा होणार आहे? का सनातनच्या आडून आज सत्तेत असलेल्या आणि हिंदुत्त्ववादी मानल्या जाणाऱ्या सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे? की एकूणच हिंदू धर्म बदनाम करण्याचा हा डाव आहे?
प्रश्न अनेक आहेत. मात्र त्यांची उत्तरे देणारे कुणी दिसत नाही. शीना बोरा प्रकरणात जसे तत्कालीन पोलिस आयुक्त राकेश मारिया वारंवार समोर येऊन माहिती देत होते, तसेच आताही पोलिस किंवा सरकारच्या प्रतिनिधींनी समोर येऊन खात्रीशीर महिती द्यायला हवी. नाहीतर जो तो उठतो आणि स्वत:ची प्रसिद्धीची पोळी भाजून घेतो, असे चित्र कायम राहील.
सन २००८ साली मुंबईत झालेले स्फोट आणि २००९ साली मडगाव- गोवा येथे झालेले स्फोट यांचा सनातनशी संबंध जोडण्याचा कॉँग्रेसवाले प्रयत्न करत आहेत. मुळात या दोन्ही घटनांचा पोलिस तपास हा कॉँग्रेसच्या सत्तेच्या काळात करण्यात आला आहे. या तपासातूनच न्यायालयाने या दोन्ही घटनांमधील सनातन संस्थेचा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असताना कॉँग्रेसचे नेते विखे पाटील आज कोणत्या आधारावर सनातनला आतंकवादी संघटना म्हणत आहेत.

No comments:
Post a Comment