- कोट्यवधींचा कथित भ्रष्टाचार व गैरप्रकारांना जबाबदार असणार्या सुधीर साळवींची हकालपट्टी करा : महेश वेंगुर्लेकरांची मागणी
- पालिका लालबागच्या राजा मंडळावर का करतेय मेहरबानी? एक विभाग दंड आकारते एक विभाग सूट देते, सहआयुक्त देसाईंची चौकशी करा!
- राजाच्या दरबारात भक्तांना जाच : गर्दीत महिलेचा मृत्यू
- दर्शनावेळी तरुणीला चोपले, रात्रभर चौकीत बसवून ठेवलं, 1200 रुपयांचा दंड केला वसूल
- पोलिसांनीच घेतला कायदा हातात; पत्रकारांना गुन्हेगारासारखी वागणूक का?
- महिला पत्रकार वृत्तसंकलन करत असताना केली मारहाण
लालबागच्या राजा मंडळाला खड्डयांसाठी 2007 ते 2012 पर्यंत मुंबई महानगरपालिकेने सूट दिली होती. मात्र 2012 पूर्वी पालिकेच्या अधिकार्यांबरोबर गैरवर्तवणूक झाल्यानंतर लालबागच्या राजाच्या दंडाची फाईल पुन्हा पुढे आली आहे. 2012 पासून ते आतापर्यंत 38 लाख 13 हजार 820 रुपये दंड आकारण्यात आला आहे. हा दंड पालिकेच्या परळ येथील एफ वॉर्ड विभागाने आकारला आहे, याची नोटीस आज मंडळाला बजावण्यात आली आहे.
भायखळा अंतर्गत येणार्या ई विभागातून जाणारा टी. बी. मार्ग ते आंबेडकर मार्गापर्यंत खड्डे करण्यात आले आहेत. हे खड्डे दर्शनासाठी असल्याचे लालबागचा राजा मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र या मार्गाचा वापर दर्शनासाठी झालाच नाही. विनाकारण रस्त्यांवर खड्डे करून सर्वसामान्यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालवला होता. या खड्डयांसाठी पालिकेने लालबागच्या राजा मंडळावर दंड आकारणी केलीच नाही. अशी माहिती आरटीआय मधून प्राप्त झाली आहे. आत्तापर्यंत पालिकेच्या ई विभागाकडून अशी दुतर्फी भूमिका घेतली जात आहे. एक विभाग दंड वसूली आकारते तर दुसरा विभाग दंड वसुली करण्याकडे कानाडोळा करते. लालबागचा राजा मंडळावर अशी मेहरबानी का? असा प्रश्न करीत जाणीवपूर्वक ढिसाळ कारभार करणारे पालिकेचे सहआयुक्त देसाई यांची याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी केली आहे.
लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव व शिवसेनेचे शिवडी विभागाचे संघटक सुधीर साळवी व त्यांच्या कार्यकारणीतील सर्वांनी कोट्यवधींची कथित माया जमविली आहे, येथे झालेला महिलेचा मृत्यू, महिला पत्रकाराला झालेली मारहाण, भाविक महिलेशी केलेली उद्धटपणे वागणूक व मारहाण या सर्व प्रकरणाला मंडळाचा सचिवांचा ढिसाळपणा कारणीभूत आहे. यामुळे साळवी यांची त्वरीत हकालपट्टी करण्यात यावी व या सर्व प्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते व ज्येष्ठ समाजसेवक महेश वेंगुर्लेकर यांनी केली आहे.
दर्शनावेळी तरुणीला चोपले
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी व्हिआयपी रांगेत घुसलेल्या तरुणीला दर्शन महागात पडले आहे. मुंबई पोलिसांनी या तरुणीला चांगलाच चोप दिला. महिला पोलिस तरुणीला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तरुणीला मारहाण केली त्यानंतर तिला काळाचौकी पोलिस स्टेशनमध्ये नेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि 1200 रुपये दंड वसुल करण्यात आला.
माझ्या आईला शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली, तिचे कपडे फाडणार्या पोलिसांना शिव्या का देऊ नये, असा संतप्त सवाल लालबाग राजाच्या दरबारात पोलिसांच्या मारहाणीला बळी पडलेल्या तरुणी नंदिनी गोस्वामी हिने विशेष मुलाखतीत विचारला.
लालबाग राजाच्या व्हीआयपी रांगेत घुसणार्या नंदिनीला पोलिसांनांकडून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी नंदिनीने पोलीस आणि लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांवर अनेक आरोप केले. ‘पैसे घेऊन अनेकदा दर्शनासाठी सोडले जाते असाही खळबळजनक आरोप नंदिनीने केला आहे.
मीरा रोडमध्ये राहणारी नंदिनी आपल्या कुटुंबासमवेत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आली होती. पण त्याचवेळी पोलिसांशी झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसांनी तिला आणि तिच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली होती.
महिला पत्रकाराशी हुज्जत घालत केली मारहाण
लालबागच्या राजाचे मोबाईल शुटींग करणार्या महिला पत्रकाराला अरेरावी करीत तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणाची दखल घेत दोषी पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना शोधून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
तरुण भारतच्या महिला पत्रकार पुनम अपराज या रात्रीच्या सुमारास लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांच्या लागलेल्या रांगेचे मोबाईलवरून शुटींग करीत होत्या. बंदोबस्तावरील काही पोलीस कर्मचारी हे त्यांच्या सहकार्यांना आतमध्ये सोडत होते मात्र, याचवेळी ते गणेशभक्तांना आतमध्ये सोडण्यास मज्जाव करीत होते.
पुनम यांनी याप्रकरणाचे मोबाईलवरून शुटींग करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी अपराज यांनी संबंधित पोलिसांना हटकले असता, पोलीस कर्मचार्यांनी त्यांना उलट उत्तरे दिली. या प्रकारानंतर अपराज या घरी जाण्यासाठी निघाल्या असताना एक महिला पोलीस कर्मचारी आणि काटकर नामक पोलीस उपनिरीक्षकांनी त्यांना अडविले. तसेच पुनम यांच्याशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की करीत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर पोलिसांनी त्यांना लालबाग येथील पोलीस चौकीत आणले. या प्रकाराची पुनम यांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यास नकार दिला.
दरम्यान, याप्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना मिळताच त्यांनी तात्काळ पुनम यांच्याशी गैरवर्तणूक करणार्या पोलीस अधिकारी-कर्मचार्यांची चोकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी पुनम या पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यास सांगितले आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त जावेद अहमद यांनी 48 तासांत रिपोर्ट देण्यास सांगितले आहे. दुसरीकडे पोलिसांचे म्हणणे आहे, की तरुणीला वारंवार नकार दिल्यानंतरही तिने व्हीआयपी रांगेत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी नकार दिल्यानंतर तिने वाद घातला.
दोषींवर कडक कारवाई करणार
गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी हे गंभीर प्रकरण असल्याचे सांगत पोलिसांना दोन दिवसांमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी याचा तपास करत असल्याचे ते म्हणाले. यात दोषी आढळलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांवर कडक कारवाई केली जाईल असेही शिंदे म्हणाले. मुंबई पोलिस सह आयुक्त देवेन भारती यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हिडिओ क्लिप मागवून पोलिसांची ओळख पटवण्यात येत आहे. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे भारती यांनी सांगितले.
व्यापार्यांची पोलिस जाचाची तक्रार
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी आवरण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात प्रचंड वाढ केली आहे. याचा फटका बसलेल्या स्थानिक व्यापार्यांनी पोलिसांवर मुजोरीचा आरोप केला होता. त्याविरोधात थेट हायकोर्टात धाव घेण्याचा इशारा लालबाग व्यापारी असोसिएशनने दिला आहे.
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भक्त येतात. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येतो. मात्र यंदा याचा स्थानिक दुकानदारांना त्रास होऊ लागला आहे. पोलिसांनी बंदोबस्ताच्या नावाखाली रस्तेच अडवले आहेत. आमचे ग्राहक, व्यापारी, पाहुणे आत येऊच शकत नाही. पोलिस समजून घेण्याच्या मन:स्थितीतच नसतात. त्यामुळे याविषयी आम्ही लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत. हायकोर्टात जाण्याचाही विचार करणार आहोत, असे लालबाग व्यापारी असोसिएशनचे खजिनदार घेवरचंद कोठारी यांनी सांगितले.
गर्दीत महिलेचा मृत्यू
भाविकांसाठी सर्वतोपरी सोय केलेली आहे अशा बाता लालबागच्या राजा मंडळाकडून केल्या गेल्या. मात्र त्या हवेतच विरल्याचा प्रत्यय नुकताच आला आहे. उषाबेन पारेख नामक एक 50 वर्षीय महिला राजाच्या दर्शनासाठी सोमवारी लालबागला आली होती. सोमवारी दर्शनासाठी उभ्या असलेल्या पारेख यांना गुदमरल्यासाखे झाले आणि त्या भोवळ येऊन कोसळल्या. मात्र लालबागच्या राजा मंडळाकडे त्यांना प्रथमोपचारासाठी कोणत्याही प्रकारची सोय नव्हती. विशेष म्हणजे केईएम रुग्णालयाकडून जी रुग्णवाहिका पाठवण्यात आली होती ती अत्यंत साधी होती. त्यात कोणत्याही प्रकारची सोय नव्हती. लालबागच्या राजा मंडळाच्या निष्क्रियतेमुळे एका 50 वर्षीय महिलेला आपले प्राण गमवावे लागले.
याबाबत महिलेच्या कुटुंबियांनी लालबागच्या राजा मंडळावर आरोप केले आहेत. उषाबेन यांची मुलगी अपेक्षा हिने आपल्या आरोपात म्हटले आहे की, सोमवारी सांयकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी माझी आई चक्कर येऊन कोसळली. मात्र मंडळाकडून कोणत्याही प्रकारे उपचाराची घाई करण्यात आली नाही. आमच्या कानावर थेट आईच्या मृत्यूची बातमी आली. उपचारासाठी केईएमला नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर भक्तगण येत असतील तर लालबाग मंडळाची ही जबाबदारी आहे त्यांच्या सुविधा व्यवस्थितपणे पुरवण्याची. मात्र मंडळाचा ह्या गलिच्छ व्यवस्थेने आज मी माझ्या आईला गमावले आहे.
वाजाने केला निषेध
देशातील पत्रकार आणि लेखकांसाठी एक व्यासपीठ असलेल्या रायटर्स अॅण्ड जर्नालिस्ट असोसिएशन अर्थात वाजाने महिला पत्रकार पूनम अपराजवरील हल्ला, तिला झालेली मारहाण आणि पोलीस अधिकार्यांद्वारा बेकायदेशीररित्या तिच्याकडून झालेली दंडवसूली करण्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी वाजाने आपल्या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी वाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष अभिजीत राणे, मुंबई अध्यक्ष कमलेश वैष्णव, वाजा सदस्य आणि विद्रोही पत्रकार तानाजी कांबळे, हरीश भानुशाली, शिवा सिंह, सुधीर नायर, अश्विनी भानुशाली आदी उपस्थित होते.
वाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष अभिजीत राणे यांनी सदर घटना अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटले आहे. एका धार्मिक ठिकाणी एका महिला पत्रकाराबरोबर अशा प्रकारचे वर्तन पोलीस कर्मचार्यांकडून होते हे अत्यंत निंदनीय आहे. या घटनेची जितकी निंदा करावी तितकी कमीच आहे. महिला पोलीस कर्मचार्यांना त्वरित अटक करून महिला पत्रकाराकडून दंडवसूली करणार्या पोलीस अधिकार्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
लालबागच्या राजाच्या अध्यक्षांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, लालबाग राजाचे उत्पन्न 15 कोटी तर खर्च 7 ते 8 कोटी आहे. हा राजा किती लोकांच्या नवसाला पावतो याची कल्पना नाही, परंतु या संस्थेच्या अधिकार्यांना मात्र राजा नक्कीच पावला असेल, असे दिसते. परंतु अनेकदा या पैशामुळे मस्ती येते आणि यामुळे भाविकांच्या जीवावर आपलं राज्य करतो, त्या भाविकांनाच हाणामारीचा प्रसाद दिला जातो. हे अत्यंत निंदनीय असून समस्त भाविकांनी देवादेवांमध्ये उच्च-नीच करण्याच्या प्रवृत्तीचा बीमोड केला पाहिजे आणि श्रीमंत राजाच्या अतिश्रीमंत मालकांचे डोके ताळ्यावर आणले पाहिजेत.
-हेमंत देसाई, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
- उन्मेष गुजराथी






